उस्मानाबाद : मुंबई, पुणे या ठिकाणी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात गणेशोत्सवाला नागरिक मोठ्या प्रमाणात जात असतात. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता ट्रॅव्हल चालकांनी या काळात भाडेवाढ केली आहे. प्रवाशांना पुण्याला जाण्यासाठी २०० रुपये जास्त मोजावे लागत आहेत. कोरोना संसर्गामुळे गतवर्षी गणशोत्सवात निर्बंध कायम होते. त्यामुळे शहरी जिल्ह्यातून मुंबई, पुणे या ठिकाणी नागरिकांना जाता आले नाही. परिणामी, ट्रॅव्हल्स व्यवसायाला फटका बसला होता. यावर्षी जून महिन्यात रुग्ण संख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. तेव्हापासून वाहतूक सेवा सुरळीत झाली आहे. सणासुदीच्या दिवसात ट्रॅव्हल्सला प्रवाशांची पसंती मिळत आहे. आता गणेशोत्सवामुळे गर्दी वाढली आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्स चालकांनी या काळात भाडेवाढ केली आहे.
या मार्गावर सर्वाधिक ट्रॅव्हल्स धावतात
उस्मानाबाद-मुंबई
उस्मानाबाद-पुणे
उस्मानाबाद-औरंगाबाद
उस्मानाबाद-नागपूर
भाडे वाढले
उस्मानाबाद-मुंबई ७०० ९००
उस्मानाबाद-पुणे ५०० ७००
उस्मानाबाद-नागपूर ९०० १२००
उस्मानाबाद-औरंगाबाद ४५० ६००
दीड वर्षानंतर बरे दिवस
गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गामुळे सण, लग्न समारंभावर निर्बंध होते. त्यामुळे प्रवासी प्रवास करणे टाळत होते. गणेशोत्सवाच्या काळात ट्रॅव्हलला प्रवासी वाढले आहेत. त्यामुळे या कालावधीत काही दिवस भाडेवाढ करण्यात आली आहे.
शफिक काझी, ट्रॅव्हल्स मालक
गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे या शहरात नागरिक मोठ्या संख्येने जात आहे. जातावेळी ट्रॅव्हल्स फुल्ल होते. येताना रिकामे परतावे लागत आहे. दोन दिवसांनंतर जाताना ट्रॅव्हल्स रिकामी घेऊन जावी लागते. येताना प्रवासी संख्या वाढेल. त्यानंतर नियमितप्रमाणे भाडेवाढ राहू शकते.
अशोक गुडवे, ट्रॅव्हल्स चालक
प्रवाशांना फटका
ट्रॅव्हल्स आरामदायी व स्वच्छ असल्याने ट्रॅव्हल्सने प्रवास करण्यास पसंती देतो. मात्र, कोरोना काळात भाडेवाढीमुळे प्रवाशांना तिकिटासाठी अधिकचे पैसे मोजावे लागत आहे.
स्वप्निल कदम, प्रवासी
पुण्याला जाण्यासाठी ५०० रुपये ट्रॅव्हल्स तिकीट होते. गणेशोत्सकाळात ७०० रुपये झाले. त्यामुळे या काळात पुण्याला जाण्यासाठी येणे-जाणे असे ४०० रुपये अधिकचे मोजावे लागत आहेत. ते परवडणारे नाही. त्यामुळे बसने पुण्याला जाणार आहे.
विशाल गायकवाड, प्रवासी