मंगरुळ : कळंब तालुक्यातील मंगरुळ येथे रविवारी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी तीन घरांवर डल्ला मारला. यात रोख रकमेसह सोन्याचे दागिनेही लंपास केले. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
येथील बाबूराव डिगांबर कानडे यांच्या घरातून १५ तोळे सोन्याचे दागिने व रोख ५ लाख ९३ हजार रुपये, बापू साळुंके यांच्या घरातून चार तोळे सोने तर नैमोद्दीन शेख यांच्या किराणा दुकानातून ८ लाख रुपयांची रोकड, असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या घटनेची माहिती कळताच शिराढोणचे सपोनि वैभव नेटके, बीट अंमलदार गणेश भारती, शौकत पठाण हे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी चोरट्यांनी तोडलेली कुलूपेही सोबत नेल्याचे दिसून आले.
दरम्यान, घटनेच्या तपासासाठी उस्मानाबाद येथून श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. हे श्वान बाबूराव कानडे घरातून माग काढत हनुमान मंदिर, ग्रामपंचायत, जि.प. शाळा परिसरात फिरून नंतर बापू साळुंके यांच्या घरापर्यंत गेले. तेथून नैमोद्दीन शेख यांच्या घरात प्रवेश करून दुकानापर्यंत पोहोचले. तेथून हे श्वान मंगरुळ-कळंब रोडलगत असलेल्या पारधी पेढी वस्तीवर गेले. दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.