परंडा : अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले असेल, तर ७२ तासांच्या आत ॲपवर विमा कंपनीला कळवण्याच्या बंधनातून शेतकऱ्यांची आता सुटका होणार असून, आता यासाठी सहा विविध पर्याय खुले करण्यात आले आहेत.
गेल्या आठवड्यापूर्वी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद, कापूस, पपई पिकाचे मोठे नुकसान झाले. मात्र, याबाबतची तक्रार ७२ तासांच्या आत करण्यासाठी दोनच पर्याय देण्यात आले होते. हा विषय किचकट ठरत असल्याने ऑफलाइन पद्धतीनेदेखील पीक नुकसानीची तक्रार स्वीकारली जावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती. यानुसार आता शेतकऱ्यांना ऑफलाइन लेखी तक्रारदेखील नोंदविण्याची मुभा देण्यात आली आहे. यासाठी कृषी कार्यालयात स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. यासोबतच शेतकऱ्यांनी ज्या बँकेत कर्ज काढले आहे, त्या बँकेतदेखील पीक नुकसानीसंदर्भात अर्ज करता येणार आहे. तसेच पीक विमा कंपनीच्या कार्यालयात विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक, ई-मेल, ॲप असे पर्यायदेखील तक्रार नोंदविण्यासाठी उपलब्ध राहणार आहेत.
चौकट...
तालुक्यातील पाचही मंडळांमध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या क्षेत्रांचे पंचनामे महसूल व कृषी विभागाच्या वतीने सुरू करण्यात आले आहेत. त्यानुसार अहवाल प्राप्त झाल्यानंतर बाधित क्षेत्र किती? हे स्पष्ट होणार आहे. शुक्रवार, शनिवार, रविवार असे सलग सुट्टीचे दिवस असतानाही शेतकऱ्यांना ऑफलाइन अर्ज करण्यासाठी मुभा असणार आहे. कृषी कार्यालयात ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
- सुजित वाबळे, तहसीलदार, परंडा
कोट...
ज्या शेतकऱ्यांना ऑफलाइन तक्रार करावयाची आहे त्यांच्यासाठी कृषी कार्यालयात विमा कक्ष उभारण्यात आला आहे. असे असले तरी बाधित पिकांचे पंचनामे करण्यासाठी कृषी साहाय्यक शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. यामुळे त्यांनाही शेतकऱ्यांकडून ऑफलाइन अर्ज स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- महारुद्र मोरे, तालुका कृषी अधिकारी, परंडा
160921\psx_20210916_123259.jpg
तहसीलदार सुजित वाबळे, तालुका कृषी अधिकारी महारुद्र मोरे स्वतः बाधित पिकाची पाहणी करीत आहेत.