शरणप्पा मलंग विद्यालय व कुमारस्वामी प्राथमिक विद्यामंदिर उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गणेश व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प उमेश उमेश खोसे यांनी गुंफले. अध्यक्षस्थानी डॉ. एम. एस. मलंग हे होते, तर व्यासपीठावर शालेय शिक्षण समितीचे अध्यख एस. के. मलंग, व्ही. के. पाटील, प्रवीण स्वामी, मुख्याध्यापक अजित गोबारे, कविराज रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
खोसे म्हणाले की, कोरोनाच्या काळामध्ये तंत्र शिक्षणाशिवाय पर्याय नाही. विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर अभ्यासाबरोबरच दैनंदिन व्यवहारांमध्ये करावा. मी स्वतः बनविलेले ५१ ॲप्स ऑफलाइन विद्यार्थ्यांना खूपच उपयुक्त ठरत आहेत. बोलीभाषेतून प्रमाण भाषेकडे या उपक्रमाअंतर्गत बंजारा समाजातील मुलांच्या भाषेमध्ये शिक्षण देण्यासाठी त्यांच्या पाठ्यपुस्तकाचे बंजारा भाषेमध्ये भाषांतर करून विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेमध्ये शिक्षण दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांना बोलीभाषेकडून प्रमाणभाषेकडे जाण्यास सोपे झाले. कोणतेही यश सहज साध्य करता येत नाही. त्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा अनेक अडचणी मला राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त होण्याअगोदर आल्या आहेत. अडचणींना घाबरू न जाता त्याचे संधीत रूपांतर करा, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे बालाजी हिप्परगे यांनी सूत्रसंचालन केले, तर परमेश्वर कोळी यांनी आभार मानले.