उस्मानाबाद : काेराेनामुळे दगावलेल्या २४ मृतदेहांवर मंगळवारी उस्मानाबाद पालिकेकडून अंत्यसंस्कार करण्यात येणार हाेते. प्रशासन पूर्वतयारी करीत असतानाच दुसरीकडे प्रत्येकी एक-दाेन नातेवाईक रुग्णालयाच्या इमारतीसमाेर उभे हाेते. यातील काहीजण सकाळपासून थांबले हाेते. हाती श्रद्धांजलीचे साहित्य घेऊन आतून येणारा हुंदका ताेंडातल्या ताेंडात दाबून अश्रूंना वाट माेकळी करून देत हाेते. हे चित्र पाहून अक्षरश: मन सुन्न झाले.
काेरोनामुळे जिल्हा रुग्णालय वा शहरातील खाजगी दवाखान्यात दगावलेल्या रुग्णांवर पालिकेकडून अंत्यसंस्कार करण्यात येतात. मंगळवारी २४ अंत्यविधी करण्यात येणार हाेते. सकाळपासूनच पालिकेचे पथक रुग्णालय परिसरात पूर्वतयारीला लागले हाेते, तर दुसरीकडे दगावलेल्या प्रत्येकाचे एक-दाेन नातेवाईक जिल्हा रुग्णालयाच्या जुन्या इमारतीच्या परिसरात थांबले हाेते. काेणी भिंतीचा आधार घेऊन, काेणी माेकळ्या जागेत, तर काेणी प्रवेशद्वारात थांबून शवागृहाकडे एकटक पाहत हाेते. साधारपणे दुपारी साडेबारा ते दीड वाजेच्या सुमारास सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही मृतदेह स्मशानभूमीच्या दिशेने नेण्यास सुरुवात झाली. यावेळी रडून-रडून काहींचा घसा काेरडा पडला हाेता, तर काहींच्या डाेळ्यांतील अश्रू डाेळ्यांतच आटले हाेते. कारण तेथे थांबलेल्या काेणाचे वडील गेले हाेते, काेणाचे मातृत्व कायमचे हरवले हाेते, काेणाचा पाठीराखा गेला हाेता, काेणाचा भाऊ गेला हाेता, काेणाच्या पत्नीने साथ साेडली हाेती. मात्र, आपल्याला साेडून गेलेल्या माणसाचा चेहरा पाहणंही त्यांच्या नशिबी नव्हतं. हे सर्व चित्र पाहिल्यानंतर मन अक्षरश: सुन्न झालं. त्यामुळे नागरिकांना, शासन, प्रशासन यांच्याकडून घालून दिलेले नियम पाळा, अकारण घराबाहेर पडू नका, घरात वृद्ध आई-वडील, लहान मुले आहेत हे लक्षात ठेवून किमान त्यांच्यासाठी तरी काळजी घ्या....