उस्मानाबाद : जिल्ह्यात रुग्णसंख्या गतीने वाढत आहे. पॉझिटिव्हीटी रेट हा महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. ना बेड उपलब्ध आहे, ना ऑक्सिजन. इंजेक्शनचाही तुटवडा आहे. बघता बघता जवळची माणसं मृत्यूला कवटाळत आहेत. अशा स्थितीत खंबीर भूमिका घ्या व ठोस उपाययोजना करा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसने पालकमंत्र्यांना सोमवारी दिला.
पालकमंत्री शंकरराव गडाख हे कोरोनाचा आढावा घेण्यासाठी सोमवारी उस्मानाबादेत आले होते. त्यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन परिस्थितीची जाणीव करून देत विविध मागण्या त्यांच्यापुढे मांडल्या. प्रत्येक तालुक्यात जंबो कोविड सेंटर उभे करावे. डीपीसी तसेच आमदार निधीतून ऑक्सिजन प्लांट उभे करावेत. रेमडेसिविर इंजेक्शन त्वरित उपलब्ध करुन द्यावे, घरोघर तपासणीची मोहीम राबवून बाधितांना अलगीकरणात ठेवावे, लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध करुन घ्यावी, खासगी फिजिशियनची मदत घेऊन जिल्हा व तालुका रुग्णालयातील गंभीर रुग्णांवर उपचार करावेत, प्रत्येक तालुक्यात व्हेंटिलेटर्सची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, अशा मागण्या पदाधिकाऱ्यांनी केल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, संजय निंबाळकर, संपतराव डोके, संजय दुधगावकर, डॉ.अविनाश तांबारे, अयाज शेख, सचिन तावडे, बिलाल तांबोळी, लतीफ पटेल व पदाधिकारी उपस्थित होते.
माणसं मराया लागलीत...
तुम्ही तीन-तीन महिने येत नाहीत. इथं माणसं तडफडून मराया लागलीत. साहेब किमान १० दिवसाला तरी उस्मानाबादला यायला पाहिजे. परिस्थितीचा आढावा घेतला पाहिजे. उपाययोजना केल्या पाहिजेत, असे आर्जव संजय दुधगावकर यांनी पालकमंत्र्यांना केले.