कळंब : शहरातील विविध खासगी रुग्णालयांत अप्रशिक्षित नर्सिंग स्टाफ कार्यरत आहे. त्यामुळे रुग्णांच्या जीविताशी खेळ करणाऱ्या अशा रुग्णालयांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीने कळंब येथे लाक्षणिक उपोषण केले.
कळंब शहरासह तालुक्यातील विविध खासगी रुग्णालयांत रुग्णांना भरती करून घेत उपचार केले जातात; परंतु अशा रुग्णालयांत कार्यरत असलेला नर्सिंग स्टाफ हा प्रशिक्षित नसतो, असा आरोप करत पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी कळंब येथील तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. या संदर्भात २० सप्टेंबर रोजीच निवेदन दिले होते; परंतु त्याची कसलीच दखल न घेतल्याने हे आंदोलन करण्यात आले. याप्रकरणी संबंधित रुग्णालयावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान, नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन लवकरच उचित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिस शेख, रिपाइं तालुकाध्यक्ष किशोर वाघमारे, प्रवीण शिंदे, टी. जी. माळी, बी. डी. शिंदे, शंकर रणदिवे, आल्ताब शेख, आकलाब शेख, सचिन तिरकर, डी. एल. चिलवंत आदी सहभागी झाले होते. बहुजन विकास मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राहुल हौसलमल यांनीही आंदोलनास पाठिंबा दिला.
200921\05561919-img-20210920-wa0021.jpg
कळंब फोटो