कळंब : नगर पालिकेची सर्वसाधारण सभा म्हटले की, नगरसेवकांनी सुचविलेले विषय अजेंड्यावर घेतले जातात. अनेकवेळा पदाधिकारी स्वत:साठी पूरक ठरतील, असे विषय घेतात. त्यामुळे खरे प्रश्न बाजुला राहतात. हीच बाब हेरून कळंब पालिकेचे प्रभारी नगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी आगामी सर्वसाधारण सभेसाठी थेट जनतेतून विषय मागविण्याचा निर्णय घेतला आहे. बहुदा हा राज्यातील पहिला उपक्रम असावा.
कळंबच्या नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे या एक महिन्याच्या रजेवर गेल्याने उपनगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी आज प्रभारी नगराध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. यावेळी नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे, मुख्याधिकारी शैला डोके, पक्षाचे तालुकाध्यक्ष श्रीधर भवर, गटनेते लक्ष्मण कापसे तसेच नगरसेवक, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी मुंदडा म्हणाले की, जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पालिकेची सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेसाठी साधारणपणे नगरसेवक विषय सुचवितात. परंतु, पालिकेच्या आगामी सभेसाठी थेट शहरातील नागरिकांतून विषय मागविण्यात येणार आहेत. त्यासाठी नगर परिषदेमध्ये दीपक हारकर, गोविंद रणदिवे या दोन कर्मचाऱ्यांकडे किंवा शहरभर फिरणाऱ्या घंटागाडीच्या कर्मचाऱ्यांकडे ५ जुलैपर्यंत नागरिकांनी विषय त्यांच्या नाव व संपर्क क्रमांकासह द्यावा, असे आवाहनही मुंदडा यांनी केले.
जनतेतून थेट विषय घेऊन त्याचा सर्वसाधारण सभेत समावेश करणारी कळंब नगर परिषद ही राज्यातील बहुदा पहिलीच नगर परिषद असावी, असेही मुंदडा यांनी यावेळी नमूद केले. पदभार स्वीकारल्यानंतर माजी नगराध्यक्ष किरण हौसलमल तसेच विविध पक्ष, संघटना, सामाजिक संस्था, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मुंदडा यांचा सत्कार केला.
चाैकट...
कळंब शहरासाठीची ३० कोटींची वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करणे, बहुउद्देशीय इमारतीचे काम सुरू करणे, डम्पिंग मैदानाचा प्रश्न मार्गी लावणे आदी कामांना या कालावधीत पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे मुंदडा म्हणाले.