उमरगा उपजिल्हा रुग्णालयास यापूर्वी तीन रुग्णवाहिका होत्या; परंतु तीन महिन्यांपूर्वी एका रुग्णवाहिकेचा अपघात झाल्याने सध्या दोन रुग्णवाहिका कार्यान्वित होत्या. या दोन्ही रुग्णवाहिका खूप जुन्या असल्याने वारंवार बंद पडत आहेत. यातील एक रुग्णवाहिका उस्मानाबाद येथे स्वॅब घेऊन गेली असता तेथेच बंद पडली. यामुळे सध्या तरी एकाच रुग्णवाहिकेवर संपूर्ण भार असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. दरम्यान, स्कूल हेल्थ चेकअपसाठीच्या गाडीचा वापर रुग्णवाहिका म्हणून करण्यात येत होता. सध्या कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि त्यातच रुग्णवाहिकांची कमतरता लक्षात घेऊन शासनाने या ठिकाणी आणखी एक रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. यामुळे रुग्णांना रुग्णालयात दाखल करणे, उपचारासाठी इतरत्र हलविण्यासाठी होणारी गैरसोय दूर झाली आहे. उपजिल्हा रुग्णालयात गुरुवारी नवीन रुग्णवाहिकेची पूजा वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक बडे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी नोडल ऑफिसर विक्रम आळंगेकर, डॉ. प्रवीण जगताप व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
उपजिल्हा रुग्णालयास मिळाली नवीन ॲम्ब्युलन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:34 IST