उस्मानाबाद - शहरातील क्रीडा संकुलात सकाळी ११ नंतर क्रिकेट खेळण्यास अनुमती देण्यात आली आहे. या आदेशाचे काटेकाेरपणे पालन व्हावे, यासाठी खुद्द जिल्हा क्रीडाधिकारी बेले सकाळीच मैदानात दाखल झाल्या. क्रिकेट खेळण्यासाठी आलेल्या मंडळीस नाेटिसीचे पालन करण्याबाबत सांगण्यात आले.
जिल्हा क्रीडा संकुल शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. दुसरे एकही मैदान नसल्याने व रस्त्याच्या कडेने चालणे धाेकादायक असल्या कारणाने ज्येष्ठांसह महिला, मुले, भरतीची तयारी करणारे तरुण, तरुणी या संकुलास प्राधान्य देतात. त्यामुळे हे संकुल नेहमी गजबजलेले असते; परंतु मागील काही महिन्यांत क्रिकेट खेळणाऱ्या मंडळींच्या बॅटमधून सुटलेले चेंडू अनेक ज्येष्ठांसह महिलांनाही लागले. अशा लाेकांनी जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. क्रिकेट खेळणाऱ्यांना आमचा विराेध नाही; परंतु त्यांना ठराविक वेळ निश्चित करून द्यावी, अशी मागणी केली. त्यानुसार जिल्हा क्रीडाधिकारी बेले यांनी सकाळी ११ ते दुपारी १ ही वेळ निश्चित करून दिली आहे. या वेळेचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी नाेटीस प्रवेशद्वारात डकविली आहे. या आदेशाचे काटेकाेर पालन व्हावे, यासाठी जिल्हा क्रीडाधिकारी बेले यांनी बुधवारी सकाळीच मैदानात तळ ठाेकला. क्रिकेट खेळण्यासाठी आलेल्या मंडळींशी चर्चा करून वेळ पाळण्याची सूचना केली. क्रीडाधिकारी कार्यालयाच्या या निर्णयाबद्दल ज्येष्ठ, महिलांसह भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांतून समाधान व्यक्त हाेत आहे.