तुळजापूर तालुक्यातील काटी कृषी मंडळांतर्गत २२ गावात २० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाचा पेरा केला. पेरणीनंतर ऐन शेंगा लगडण्याच्या वेळी पावसाने दीड महिन्याची ओढ दिली. त्यामुळे उत्पादनात घट येणार व नुकसान गृहीत घरून कृषी विभागाने विमा प्रतिनिधींसह पंचनामे केले, परंतु त्याची मदत अद्याप मिळाली नाही. यानंतर पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने चार-चार शेंगा लागल्या. ते सोयाबीन आता कापणीला आले असतानाच गुरुवारी रात्री मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होऊन सोयाबीन पिकात पाणी साचले. त्यामुळे कापणीला आलेले पीक पदरात पडेल, याची शाश्वती राहिली नाही.
चौकट
मजुरीचा दर वाढला
सोयाबीन कापणीचा हंगाम चालू होण्याच्या मार्गावर असतानाच पावसाचा धुमाकूळ सुरू झाला आहे. एक बॅग सोयाबीन कापणीला साडेचार ते पाच हजार रुपये दर मजुराकडून आकारला जात आहे. त्यामुळे उत्पादनापेक्षा मजुरीचा दर अधिक झाल्याने शेतकऱ्याचे आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता आहे
विमा कंपन्यांकडे तक्रारी नोंदवा
सोयाबीन पिकात पावसाचे पाणी साचून नुकसान होते. कापणीला आलेले पीक पाण्यात जास्त दिवस तग धरू शकत नाही. त्यामुळे नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी ७२ तासाच्या आत आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन काटीचे मंडळ कृषी अधिकारी आनंद पाटील यांनी केले आहे.
कोट......
सन २०२० मध्ये ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत तुळजापूर तालुक्यात सोयाबीनचे पीक पूर्णपणे वाया गेले. त्या पिकाची नुकसानभरपाई वर्ष झाले तरी अद्याप मिळाली नाही. चालूवर्षीही पावसाच्या प्रदीर्घ विश्रांतीचा फटका सोयाबीन, उडीद पिकाला बसला. उत्पादनात सुमारे ५४ टक्के घट झाल्याचा अहवाल शासनाकडे सादर झाला आहे. आता उर्वरित पिकातही पावसाचे पाणी साठून ते कुजत आहे. त्यामुळे तातडीने नुकसानभरपाई द्यावी.
- रामदास मगर, शेतकरी, सांगवी (काटी)