अविनाश इटकर/सोनारी (जि. उस्मानाबाद) : अवघ्या सव्वा एकरात शास्त्रशुद्ध पद्धतीने कलिंगडाची लागवड करून तब्बल ११ लाखांचे उत्पन्न मिळविण्याची किमया सोनारी येथील एका शेतकऱ्याने साधली आहे. यात दुग्धशर्करा योग म्हणजे हे कलिंगड आता सोनारीहून थेट दुबई सफरीवर निघाले आहे. शेती आतबट्ट्याची झालीय, हे खरेच. मात्र, त्यातूनही संधी साधणाऱ्या या शेतकऱ्याचे कौतुक होत आहे.
परंडा तालुक्यातील सोनारी येथील शहाजी गाडे हे गेल्या १० वर्षांपासून आपल्या कुटुंबासह शेती व्यवसायात रमले आहेत. त्यांना १५ एकर शेती आहे. त्यापैकी सव्वा एकरात त्यांनी ५ जूनरोजी सहा फुटांवर सरी (बेड) काढून सव्वा फूट अंतरावर दोन रोपे याप्रमाणे मेलोडी जातीच्या पंधरा हजार कलिंगड रोपाची लागवड केली होती. त्याची उत्तम जोपासना करून ४० टन उत्पन्न त्यांनी घेतले आहे. २० जुलैरोजी सोनारी येथून कलिंगडाचा लॉट मुंबईला रवाना झाला. तेथून तो दुबईला निर्यात होत आहे. दरम्यान, मंगळवारी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्याहस्ते गाडे यांच्या शेतातील कलिंगड प्लाॅटचे पूजन करून गाडे यांचा सत्कार करण्यात आला. सौदागर देवमाने, लहू पाटील, गणेश राशिनकर, जयराम नलवडे, प्रशांत शहा, अमर गाडे व शेतकरी उपस्थित होते.
आता ५५ टनाचे टार्गेट...
शेतकरी शहाजी गाडे यांनी मोहोळ येथून कलिंगडाची रोपे घेतली होती. त्याची उत्तम जोपासना केल्यानंतर यावेळी ४० टन उत्पादन निघाले आहे. पुढील वेळेस एकरी ५५ टन उत्पादन घेण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. गाडे हे त्यांच्या शेतीत विविध प्रयोग करीत असतात. पारंपरिक पिकांऐवजी शिमला मिरची, ऊस, कांदा, कलिंगड, पपई, झेंडू, अद्रक अशा पिकांची लागवड ते करीत आहेत.
कोट...
मी गेली दहा वर्षे शेती करतोय. बऱ्याचदा मला तोटाही सहन करावा लागला. मात्र चिकाटी सोडली नाही. विविधप्रकारचे उत्पन्न घेत राहिलो. गेल्यावर्षी शिमला मिरचीतून मला बावीस लाखांचे उत्पन्न झाले. आता कलिंगडातून सुमारे अकरा लाख रुपये उत्पन्न मिळत आहे.
यंदाही आणखी पाच एकर सिमला मिरची असून, त्यातूनही वीस लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे.
- शहाजी अर्जुन गाडे, शेतकरी, सोनारी.