समिती ठरविणार अवघड क्षेत्रातील शाळा, चुकीची माहिती भरल्यास आता थेट निलंबन
उस्मानाबाद -जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांच्या मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागात धडकल्या आहेत. त्यानुसार जिल्हाभरातील सुमारे सहाशेवर शिक्षक बदलीसाठी पात्र असल्याची माहिती समाेर आली आहे. चुकीची माहिती ऑनलाईन भरून बदली करून घेतल्याचे वा सूट मिळविल्याचे स्पष्ट झाल्यास आता अशा गुरूजींविरूद्ध थेट निलंबनाची कारवाई करून विभागीय चाैकशी प्रस्तावित केली जाणार आहे.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेच्या आदेशाकडे शिक्षकांचे लक्ष लागले हाेते. अखेर शासनाचा आदेश शिक्षण विभागात धडकला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या बदली प्रक्रियेत अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. पूर्वी प्रमाणेच चार संवर्गात बदल्या केल्या जाणार आहेत. संवर्ग १ मध्ये दिव्यांग, संवर्ग २ मध्ये पती-पत्नी एकत्रिकरण, संवर्ग ३ मध्ये अवघड क्षेत्रातील शाळा व संवर्ग ४ मध्ये जिल्ह्यात १० वर्ष सेवा झालेले शिक्षक बदलीस पात्र असणार आहेत. मागील वर्षी जिल्ह्यातील अनेकांनी चुकीची माहिती भरून बदलीचा लाभ घेतला. तर काहींनी सूट मिळविली. चाैकशीअंती हा प्रकार उजेडातही आला. परंतु, अशा गुरूजींवर कुठल्या स्वरूपाची कारवाई करावी, या अनुषंगाने शासनाचे स्पष्ट निर्देश नव्हते. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वेतनवाढी बंद केल्या हाेत्या. अशा शिक्षकांची संख्या ५४ एवढी हाेती. अशा प्रकारांना कायमचा आळा बसावा, यासाठी शासनाने बदली आदेशात सुधारणा केली आहे. जे शिक्षक चुकीची माहिती भरून बदलीचा लाभ घेतील वा सूट मिळवतील त्यांच्याविरूद्ध थेट निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश आहेत. हे प्रकरण एवढ्यावरच थांबणार नाही तर त्यांच्याविरूद्ध विभागीय चाैकशीही प्रस्तावित केली जाणार आहे. त्यामुळे चुकीची माहिती भरण्यासारख्या गैरप्रकारांना निश्चित आळा बसेल, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. शिक्षकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे, पूर्वी शिक्षकांना केवळ वीस शाळा सुचविता येणार होत्या. आता ही संख्या ३० वर नेण्यात आली आहे. दरम्यान, शासनाचा आदेश धडकताच शिक्षण विभागाने लागलीच काम सुरू केले आहे. गुरूवारी दिवसभरात जिल्हाभरातील बदलीस पात्र शिक्षकांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार अशा शिक्षकांची संख्या तब्बल सहाशेवर पाेहाेचली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
चाैकट...
काय केले आहेत बदल..?
पूर्वी संवर्ग १ मधील शिक्षक एक वर्ष सेवा केल्यानंतर बदलीस पात्र ठरत हाेते. आता त्यांना तीन वर्ष सेवा बंधनकारक केली आहे. संवर्ग २ मध्ये पती-पत्नी एकत्रिकरण अंतर्गत बदलीसाठी आता १ ऐवजी तीन वर्ष सेवा आवश्यक केली आहे. संवर्ग ३ मध्ये अवघड क्षेत्रातील शाळांवरील शिक्षकांचा समावेश आहे. परंतु, जिल्ह्यातील एकही शाळा अवघड क्षेत्रात दाखविण्यात आली नव्हती. दर तीन वर्षांनी अवघड क्षेत्रातील शाळांची यादी रिवाईज केली जाते. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. तर संवर्ग चारमध्ये ज्या शिक्षकांची जिल्ह्यातील सेवा १० वर्ष व शाळेवरील सेवा ३ वर्ष झाली आहे, ते बदलीस पात्र असतील. पूर्वी शाळेवरील सेवा ५ वर्ष असावी लागत हाेती.
काेणाच्या हाेणार बदल्या?
राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्राथमिक शिक्षक संवर्गातील मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक व प्राथमिक शिक्षक बदलीसाठी पात्र असणार आहेत. यासाठी संबंधित शिक्षकांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. भरलेली माहिती अचूक असणे गरजेचे आहे. अन्यथा पडताळणीत माहिती चुकीची निघाल्यास आता थेट निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. ही प्रक्रिया एवढ्यावरच थांबणार नाही तर अशा शिक्षकांची विभागीय चाैकशीही प्रस्तावित करण्यात येणार आहे, हे विशेष.