पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथून वाहणाऱ्या मांजरा नदीला पूर आल्यामुळे नगदीकाठच्या शेतातील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. या पिकांची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी पालकमंत्री थेट बांधावर दाखल झाले. यावेळी सुशिक्षित बेराेजगार शेतकरी विनायक आखाडे यांनी ‘‘साहेब, माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे. त्यामुळे मी संकटापुढे गुढगे टेकवून आत्महत्या करणार्यातील नाही. मात्र, शासनानेही काेल्हापूरच्या धर्तीवर भरीव मदत द्यावी’, अशी मागणी शेतकऱ्याच्या वतीने केली.
उस्मानाबाद जिल्ह्याचे शेवटचे गाव असणारे पारगाव या,ठिकाणी गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली होती. त्याच बरोबर या ठिकाणाहून वाहणारी मांजरा नदीच्या उगमपट्ट्यातही मोठा पाऊस झाल्याने नदीला महापूर आलेला होता. त्यामुळे मांजरा नदिलगत असलेल्या शेतीतील पिकांचे अताेनात नुकसान झाले. दरम्यान, ही नुकसान पाहण्यासाठी पालकमंत्री शंकरराव गडाख शुक्रवारी दुपारी १२ वाजता थेट शेतात दाखल झाले. यावेळी उपस्थित शेतकरी विनायक कल्याण आखाडे यांनी आपली कैफियत मांडली. २०१६ मध्येही अशीच महापुराची परस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळीही नदीलगत असलेली पिके पूर्णपणे नेस्तनाबूत झालेली होती. तत्कालीन सरकारने मदतीचे आश्वासन देत तोंडाला पाने पुसून फक्त एकरी ८०० रुपये दिले होते. यावेळीही भयानक परस्थिती आहे. मी स्वतः एम. ए. बीएड सेट उत्तीर्ण आहे. बेरोजगारीमुळे शेती करत आहे. मात्र निसर्ग साथ देत नाही आणि सरकार तोंडाला पाने पुसत आहे. यावेळी तरी कोल्हापूरच्या धर्तीवर हेकटरी २० हजार रुपये मदत द्यावी. कारण माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी असल्याने मी आत्महत्या तर करू शकत नाही. मात्र सरकारने भरीव मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्याच्या वतीने त्यांनी केली. दरम्यान, पालकमंत्री गडाख म्हणाले, शासनाकडून अधिकाधिक मदत मिळावी, यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील. साेबतच नदी पात्राच्या खाेलीकरणाचे कामही हाती घेतले जाईल. यासाठी प्रत्येक शेतकऱ्यानी १०० रूपयांच्या बाॅण्डवर लिहून द्यावे. यानंतर लागलीच काम सुरू केले जाईल. शिवाय काेल्हापुरी बंधाराही दुरूस्त करू, अशी ग्वाही दिली. कळंब उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ, तहसीलदार नरसिंग जाधव, तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले, गटविकास अधिकारी राजगुरू, जि. प.चे पशुसंवर्धन सभापती दत्ता साळुंखे, सरपंच महेश कोळी, उपसरपंच कॉ.पंकज चव्हाण, बाबा घोलप, विकास तळेकर, तात्यासाहेब बहिर, महेश आखाडे, श्रीनिवास उंदरे, बाबा हारे, तानाजी कोकाटे, बंडू मुळे, राष्ट्रवादीचे प्रकाश मोटे, समाधान मोटे, धनंजय मोटे, प्रकाश आखाडे आदींची उपस्थिती हाेती.
यांनी दिले निवेदन...
पारगाव ग्रामपंचायतीच्या वतीने रखडलेल्या कामांचे निवेदन उपसरपंच काॅ. पंकज चव्हाण यांनी दिले. तर मराठा महासंघाचे अध्यक्ष मुजमिल पठाण यांनीही निवेदन दिले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी त्यांनी केली.
चंद्रकांत पाटलांनी काळजी करू नये...
राज्य सरकारच्या भवितव्याच्या अनुषंगाने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच एक वक्तव्य केले हाेते. त्यांच्या या वक्तव्याच्या अनुषंगाने विचारणा केली असता, त्यांनी सरकारच्या स्थिरतेबाबत काळजी करू नये. त्यांनी कितीही स्वप्न पाहिले तरी राज्यातील महाविकास आघाडी सरकार मजबूत आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वात हे सरकार एकदिलाने काम करीत आहे.