उमरगा तालुक्यातील अनेक गावांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गोकुळ शुगर्स लि. धोत्री, मातोश्री शुगर्स, दुधनी अक्कलकोट, भाऊसाहेब बिराजदार साखर कारखाना समुद्राळ, विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना मुरूम, लोकमंगल शुगर्स खेड, सिद्धेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखाना दहीटने आदी कारखान्यांना ऊस घातला. यापैकी माताेश्री या साखर कारखान्याने संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत एकही हप्ता देण्यात आलेला नाही. इतर सर्व कारखान्यांनीही पहिला हप्ता वगळता संपूर्ण बिल वितरित केले नाही, असे शेतकरी सेनेचे म्हणणे आहे. या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आमदार ज्ञानराज चौगुले यांनी १२ जून २०२१ रोजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन याविषयी पत्राद्वारे विनंती केली होती. त्यानुसार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी ७ जुलै राेजी प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांना पत्र देऊन तत्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आदेश दिले हाेते. मात्र, या पत्रास जवळपास २ महिन्यांचा कालावधी लाेटला असतानाही कोणतीच कार्यवाही झालेली नाही. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी थकीत बिल एफआरपी प्रमाणे मिळावे, या प्रमुख मागणीसाठी २ सप्टेंबर राेजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमाेर लाक्षणिक उपाेषण केले. आंदाेलनात शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख बलभीम येवते, जिल्हा संघटक विलास भगत, तुकाराम वंडरगे, अंबादास मंमाळे यांच्यासह शेतकरी माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.
ऊसाच्या थकीत बिलासाठी शेतकरी सेनेचे उपाेषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:34 IST