उस्मानाबाद : राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ पूर्वीच जाहीर केली असून या योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू आहे. योजनेअंतर्गत आज ४७५ गावांतील २६२५ पात्र लाभार्थ्यांची सातवी यादी प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक यांनी आज येथे दिली.
आज अखेर एकूण ७३ हजार ८२ लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यापेकी ४ जानेवारी २०२१ पर्यंत ६८ हजार ७७७ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण पूर्ण केले असून, यातील ६८ हजार २८१ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर ४९४ कोटी ९६ लाख रुपये जमा केले आहेत. शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळण्याकरिता आधार प्रमाणिकरण करणे अनिवार्य आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील ४ हजार ३०५ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण होणे बाकी आहे.
ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणिकरण केले नाही, अशा शेतकऱ्यांनी शारीरिक अंतराचे पालन करून आपले सरकार सेवा केंद्र किंवा संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेशी संपर्क साधून आधार प्रमाणिकरण करून घ्यावे. तसेच, आधार प्रमाणीकरण प्रक्रियेदरम्यान कर्जखाते रकमेत कोणतीही तफावत असल्यास ‘रक्कम अमान्य’ पर्याय उपयोगात आणण्यापूर्वी आपल्या बँक शाखेशी संपर्क साधून कर्जरकमेची खात्री करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी केले आहे.