येरमाळा -बँका पीक कर्ज देत नाहीत...खेटे मारायला लावतात...अशा तक्रारी शेतकऱ्यांकडून नेहमीच ऐकावयास मिळतात. परंतु, सर्वच बँका आणि तेथील अधिकारी सारखे नसतात. असाच अनुभव सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) येरमाळा शाखेअंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना येत आहे. पदरमाेड करून शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी बँकेत खेटे मारण्याची वेळ येऊ नये, म्हणून थेट शेतकऱ्यांच्या दारी जावून कर्ज देण्याचा स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र काैतुक हाेत आहे.
शेतकरी वेळेवर पीक कर्ज भरत नाही, असा आराेप करून बहुतांश बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी सावकारांचे उंबरठे झिजवावे लागतात. अशा कर्जाचा डाेंगर वाढल्यानंतर शेतकरी आत्महत्येसारखे टाेकाचे पाऊल उचलतात. त्यामुळे शासनाकडून वेळाेवेळी बँकांना पीक कर्ज वितरणाची गती वाढविण्याबाबत आदेशित केले जाते. परंतु, जुमानतील त्या बँका कसल्या. एकीकडे हे सर्व घडत असताना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या येरमाळा शाखेने स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी बँकेत येण्याची गरज भासू नये, म्हणून थेट शेतकऱ्यांच्या घरी जावून पीक कर्ज वाटप तसेच नूतनीकरण सुरू केले आहे. ऋण समाधान याेजनेच्या माध्यमातून ही याेजना जवळपास चाळीस गावांत राबविली जात आहे. या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र काैतुक हाेत आहे. दरम्यान, संजितपूर येथे पीक कर्ज नूतनीकरण व पीक कर्ज वाटप मेळावा पार पडला. यावेळी बँकेचे व्यवस्थापक शरद वाठोडे, आब्देश झा, कृषी अधिकारी अविनाश खिल्लारे, नंदकुमार पवार, माजी सरपंच प्रभाकर पाटील,ज्ञानोबा पाटील, मारुती बाराते, समाधान बाराते, लक्ष्मण पाटील, कल्याण बाराते, मधुकर बाराते, सचिन बाराते, अर्जुन मगर आदी उपस्थित हाेते.