उस्मानाबाद : काेराेना संकटाच्या काळात जिल्हा नियाेजन समितीच्या बैठका झाल्या नाहीत. त्यामुळे साेमवारच्या बैठकीकडे जिल्हावासीयांच्या नजरा लागलेल्या हाेत्या; परंतु या बैठकीत जिल्ह्याचे प्रश्न, विकासकामांवर चर्चा कमी अन् उणेदुणे अधिक हाेते. विशेष म्हणजे, शिवसेनेचे माजी मंत्री तथा आमदार प्रा. तानाजी सावंत यांनी थेट सेनेचे खासदार, आमदार अन् सत्ताकेंद्रावर धनुष्य ताणले.
काेराेनाच्या संकटामुळे बैठका, सभा रद्द करण्यात आल्या हाेत्या. काेराेनाचा संसर्ग ओसरल्यानंतर शासनाने बैठका घेण्यास हिरवा कंदील दिला. नवीन वर्षातील ही पहिलीच बैठक असल्याने जिल्ह्याच्या विकासाच्या अनुषंगाने काेणकाेणत्या बाबींना प्राधान्य द्यायचे? काेणत्या कामावर अधिक भर द्यायचा? आदींचे नियाेजन या बैठकीत हाेणे अपेक्षित हाेते; परंतु विकासकामांच्या नियाेजनावर चर्चा कमी अन् उणेदुणे काढण्यावरच डायसवर बसलेल्या नेत्यांचा भर दिसला. सुरुवातीला काही विषयांवर चर्चा झाल्यानंतर शिवसेनेचे माजी मंत्री तथा आमदार तानाजी सावंत यांनी थेट सेनेचे सत्ताकेंद्र असलेल्या उस्मानाबाद पालिकेवर शिवधनुष्य ताणले. मागासवर्गीय वस्त्यांच्या विकासकामांत गैरप्रकार झाला आहे. त्यामुळे त्यांची चाैकशी करावी, अशी मागणीच त्यांनी केली. बराचकाळ चर्चा झाल्यानंतर पालकमंत्री गडाक यांनी पत्र देण्यास सांगितले. यानंतर सेना आमदार कैलास पाटील यांनी जिल्हा परिषदेने हातलाई प्रकल्पावर पाऊण काेटी रुपये खर्च करून तरंगते कारंजे बसविले; परंतु ते अद्याप का सुरू नाहीत? याबाबतची विचारणा सीईओ डाॅ. फड यांच्याकडे केली. त्यावर डाॅ. फड यांनी ‘ताे’ प्रकल्प जिल्हा परिषदेचा नसल्याचे स्पष्टीकरण देताच, त्याची चाैकशी करण्याची मागणी केली. हाच धागा पकडून नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर बाेलते झाले. जिल्हा परिषदेची जागा नसताना तेथे कारंजे बसविलेच कसे? असा सवाल करीत हे सर्व रेकाॅर्डवर घेण्याबाबत मागणी केली.
यानंतर नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गतच्या प्राधान्यक्रमाची मर्यादा वाढवून कळंब तालुक्यातील दुधाळवाडी व रामदारा साठवण तलावापर्यंतची कामे प्राधान्यक्रमात घेण्यास परवानगी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडी सरकारचा अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यावर ‘‘यासाठी मी प्रयत्न केले आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर वा आमदार कैलास पाटील यांचे काेणाचेही प्रयत्न नाहीत’’, असे आ. सावंत म्हणाले. त्यावर नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी ‘‘मी खासदार वा आमदारांची नावे घेतली नाहीत. महाविकास आघाडीच्या अभिनंदनाचा ठराव मांडला आहे’’, असे ते म्हणाले. यानंतर खासदार ओमराजे, आ. पाटील बाेलते झाले; परंतु त्यांना फारसा वाव मिळाला नाही. या दाेन मुद्द्यांवर काथ्याकुट झाल्यानंतर महावितरण तसेच जलसंधारणाच्या कामांवर चर्चा झाली. यानंतर बैठक आटाेपली.
चाैकट....
सावंत-शेरखाने यांच्यात शाब्दिक चकमक
पालकमंत्री गडाक विश्रामगृहावर थांबले असता आमदार सावंतही तेथे गेले हाेते. त्या ठिकाणी खा. ओमराजे, आ. पाटील तसेच सेनेचे नितीन शेरखानेही उपस्थित हाेते. ‘‘मला पालकमंत्र्यांशी बाेलायचे आहे, आपण बाहेर व्हा’’ असे सावंत यांनी म्हणताच शेरखाने संतप्त झाले असता दाेघांमध्ये जाेरदार शाब्दिक खटके उडाले.
आम्हाला बाेलू द्या हाे...
पालकमंत्र्यांच्या शेजारी बसलेल्या निमंत्रित सदस्यांतच उणेदुणे सुरू झाल्यानंतर समाेर बसलेले सदस्य आवाक् झाले. अनेकजण आपापल्या भागातील प्रश्न मांडण्यासाठी तयारी करून आले हाेते; परंतु संधीच मिळत नसल्याने राष्ट्रवादीच्या सदस्या सक्षणा सलगर, महेंद्र धुरगुडे तसेच प्रकाश चव्हाण, आदींनी ‘‘निमंत्रित सदस्यांना विधानसभेत प्रश्न मांडण्याची संधी आहे. आम्हाला येथे प्रश्न मांडू द्या’’, अशा शब्दांत विनंती केली.
राजकारणाचे जाेडे सभागृहाबाहेर साेडून येणे गरजेचे...
काेराेना संकटामुळे अनेक महिन्यांनंतर जिल्हा नियाेजन समितीची बैठक झाली. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासावर चर्चा करून दिशा ठरविणारे नियाेजन या सभागृहात हाेणे गरजेचे आहे; परंतु या ठिकाणी झालेले आराेप-प्रत्याराेप पाहून आपण व्यथित झालाे आहाेत. राजकारण करण्यासाठी आपणा सर्वांना बाहेर वाव आहे. जिल्ह्याचे लक्ष असलेल्या अशा नियाेजन समितीच्या बैठकीला येताना तरी जिल्ह्यातील लाेकप्रतिनिधींनी राजकारणाचे जाेडे सभागृहाबाहेर साेडायला हवेत. मी अनेक जिल्हे पाहिले; परंतु असे चित्र कुठेही पाहावयास मिळाले नाही, अशा शेलक्या शब्दांत पालकमंत्री गडाक यांनी उणेदुणे काढणाऱ्या नेत्यांचे कान टाेचले.
चिंध्या उचकण्यापेक्षा निधी मागा...
आमदार सुरेश धसही बैठकीला उपस्थित हाेते. शेतकऱ्यांना भेडसाविणाऱ्या विजेच्या प्रश्नांवरून त्यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता पाटील यांची चांगलीच कानउघाडणी केली. त्यांनी मंजूर निधी अन् खर्चाचा लेखाजाेखा विचारल्यानंतर पाटील बुकलेट पाहून सांगू लागताच, अशा चिंध्या उचकण्यापेक्षा अधिक निधी मागा अन् आलेले संपूर्ण पैसे खर्च करा, असे सांगितले.
रस्ते, वीज, लसीकरणाचे मांडले प्रश्न
जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे यांनी मंगरूळ येथील स्मशानभूमीच्या संरक्षक भिंतीसाठी १० लाख, मंगरूळ चाैक ते लबडेवस्तीपर्यंतच्या रस्त्यासाठी २० लाख देण्याची मागणी केली. तसेच संदीप मडके यांनी लंपी स्कीन लसीकरणासाठी वाढीव निधी द्यावा, अशी विनंती पालकमंत्र्यांना केली. प्रकाश चव्हाण यांनी अतिवृष्टीत वाहून गेलेेले रस्ते, माेडून पडलेले विद्युत खांब पुन्हा उभारण्यासाठी भरीव निधी देण्याची मागणी केली.