कळंब : रस्ता दुभाजक, पूर्ण रूंदीचे काम, नव्या कामाला गेलेले तडे अशा अनेक विषयांवर नागरिकांनी विचारणा केली असता, टोलवाटोलवी केली जात असल्याने डोळ्यावर पट्टी व कानावर हात ठेवलेल्या बांधकाम विभागाच्या कार्यशैलीची कैफियत आता थेट बांधकाम मंत्री व सचिवांकडे मांडण्यात आली आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते डिकसळ असा शहरी भाग असलेल्या रस्त्याची सुधारणा करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हायब्रिड ॲन्युईटी उपक्रमांतर्गत बांधणी करण्यात येत असलेल्या कळंब तेर ढोकी या रस्त्यावरील दोन किलोमीटर लांबीचा हा भाग आहे. शहरातील मोंढा, छत्रपती शिवाजी चौक, बाजार मैदान, परळी रोड, होळकर चौक, सराफा लाइन यांसह विविध नागरी वसाहतींना जोडणाऱ्या या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे; मात्र काम करताना अनेक उणिवा दिसून येत आहेत.
अस्तित्वातील रूंदी जास्त असताना काम कमी धरण्यात आले आहे. यातच दुभाजकही ठेवलेला नाही. एका बाजूला झालेल्या कामाला काही ठिकाणी तडे गेले आहेत. अशातच गच्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या या कामाचा ‘पार्ट टू’ मागच्या चार दिवसात सुरू झाला आहे. याविषयी या भागात राहणारे नागरिक मुस्तान मिर्झा यांनी संबंधित बांधकाम अभियंते, दर्जा राखण्यासाठी नेमलेली त्रयस्थ एजन्सी यांना तांत्रिक बाबी संदर्भात विचारणा केली असता, कोणीही माहिती देण्यास तयार नाही. यामुळे अखेर मिर्झा यांनी याची सार्वजनिक बांधकाम मंत्री, सचिव यांच्याकडे कैफियत मांडली आहे. आता यास तिथे दाद मिळते की, तेथेही टोलवाटोलवी होते, याकडे लक्ष लागले आहे.
चौकट...
एकमेकांकडे बोट
कळंब शहरातील ढोकी रोडवरील कामावर, कामाचा दर्जा राखण्यासाठी एका त्रयस्थ एजन्सीला नेमले आहे. यासंदर्भात मिर्झा यांनी त्या एजन्सीला तांत्रिक बाबींची विचारणा केल्या असता, त्यांनी वरच्या साहेबांकडे तर वरच्या साहेबांनी बांधकामकडे बोट दाखवल्याचा अनुभव आल्याचे सांगितले. त्यावर उस्मानाबाद येथील वरिष्ठ अधिकारी यांना संपर्क केला असता, त्यांनी दुसऱ्याच अधिकाऱ्यांकडे दिशानिर्देश दिल्याचा अनुभव मिर्झा यांना आला.
चुकीच्या कामाला एजन्सीची संमती?
बांधकाम खाते, कामावर नेमलेली त्रयस्थ एजन्सी तांत्रिक मापदंड काय आहेत, पूर्ण रूंदी का करत नाहीत, दुभाजक का ठेवण्यात आला नाही, याची उत्तरे तर सोडा साध्या अंदाजपत्रकीय बाबी शहरवासीयांना दाखवल्या जात नाहीत. याविषयी बांधकाम खात्याचे अधिकारी माहिती दडवत असल्याने व यामुळे चुकीच्या पद्धतीने काम मार्गी लावले जात असलेल्या या कामास अधिकारी व त्रयस्थ एजन्सी यांची संमती दिसून येत असल्याने याची चौकशी करावी, अशी मागणी मुस्तान मिर्झा यांनी बांधकाम मंत्री, सचिव यांच्याकडे केली आहे.