रुई हे १०० ते १२० उंबऱ्यांचे गाव आहे. या गावाला वीजपुरवठा करण्यासाठी राजेंद्र साेपान उंदरे यांच्या शेतात ट्रान्सफार्मर बसविण्यात आला आहे. या ट्रान्सफार्मरवरून गावात वीजपुरवठा पुरवला जातो. साधारपणे दीड महिन्यापूर्वी हा ट्रान्सफार्मर जळाला हाेता. यानंतर दाेन वेळा ट्रान्सफार्मर बदलला. थोडाबहुत वीजपुरवठा सुरळीत झाला असतानाच तीन दिवसांपूर्वी हा ट्रान्सफार्मर पुन्हा जळाला आहे. त्यामुळे हे गाव पुन्हा काळ्याकुट्ट अंधारात बुडाले आहे. याचा फटका ग्रामस्थांना साेसावा लागत आहे. या प्रश्नाकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज यानिमित्ताने व्यक्त केली जाऊ लागली आहे.
दीड महिन्यापासून गावात वीज गायब आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी अडचणी येत आहेत. शिवाय घरातील कोणतेच विद्युत उपकरण चालवता येत नाहीत. नियमित वीजबिल भरणा करणाऱ्यांनाही वेळेवर वीज मिळत नसल्याने अंधारात राहावे लागत आहे.
-लक्ष्मण भीमराव घुले, ग्रामस्थ.
रूई गावातील ट्रान्सफार्मर दाेन वेळा जळाला आहे. दाेन्ही वेळा ट्रान्सफार्मर बदलून दिला. मात्र, त्यात सातत्याने बिघाड येत आहे. ग्रामस्थांची गैरसाेय लक्षात घेऊन ट्रान्सफार्मर उपलब्ध करून दिला आहे. शुक्रवारी हा ट्रान्सफार्मर बसेल.
-अतुल यादव, कनिष्ठ अभियंता.