उस्मानाबाद : तुळजापुरातील प्राचीन तीर्थकुंडावर मालकी सांगून ताबा मिळवल्याचा आरोप असलेल्या रोचकरी बंधूंचा कारागृहातील मुक्काम आणखी वाढला आहे. जिल्हा न्यायालयात त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु असून, आता पुन्हा ६ तारीख ठेवण्यात आली आहे. त्यामुळे रोचकरी बंधूंचा जिल्हा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.
तुळजापूर शहरातील प्राचीन मंकावती तीर्थकुंड हे आपल्या पूर्वजाच्या मालकीचे असल्याचा दावा करीत देवानंद रोचकरी व त्यांच्या बंधूंनी त्यावर ताबा मिळविला आहे. मात्र, मुळता या तीर्थकुंडाची मालकी ही नगरपालिकेची असल्याचे चौकशीतून समोर आल्यानंतर बनावट कागदपत्रे तयार करुन तीर्थकुंडावर मालकी लावून घेतल्याप्रकरणी कारवाईचे आदेश जिल्हाधिकार्यांनी नुकतेच दिले होते. त्यानुसार तुळजापूर पालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी देवानंद रोचकरी व त्यांचे बंधू बाळासाहेब रोचकरी यांच्यावर गुन्हा दाखल केला. यानंतर या दोघांनाही अटक करण्यात आली. देवानंद रोचकरी यांना मुंबईतून ताब्यात घेण्यात आले. तर बाळासाहेब रोचकरी हे स्वत:हून पोलिसांत दाखल झाले. त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. दरम्यान, त्याच दिवशी तुळजापूरच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र, तो फेटाळून लावण्यात आला होता. यानंतर मग आरोपींच्या वतीने जिल्हा न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. त्यावर सध्या युक्तीवाद सुरु आहेत. गुरुवारीही सरकारी पक्ष व आरोपींच्या वतीने युक्तीवाद करण्यात आला. त्यानंतर आता पुढील सुनावणी ही ६ सप्टेंबर रोजी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे तूर्त आरोपी रोचकरी बंधूंचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.