उस्मानाबाद / तुळजापूर : तुळजापुरातील प्राचीन तीर्थकुंड हडपल्याचा आरोप असलेल्या रोचकरी बंधुंचा कारागृह मुक्काम काही केल्या संपताना दिसत नाही. तुळजापूरच्या न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर, जिल्हा न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. त्यावर सुनावणी सुरूच असून, आता पुन्हा गुरुवारी सुनावणी ठेवण्यात आली आहे.
तुळजापूर शहरातील प्राचीन मंकावती तीर्थकुंड आपल्या पूर्वजांची मिळकत असल्याचा दावा करीत, देवानंद रोचकरी व त्यांच्या बंधुंनी त्यावर ताबा मिळविला आहे. दरम्यान, याबाबत तक्रारी झाल्यानंतर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी फौजदारी कारवाईचे आदेश दिले. या प्रकरणात रोचकरी बंधुंवर बनावट कागदपत्रे बनवून तीर्थकुंडावर आपली मालकी लावल्याचा आरोप असून, त्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही बंधुंना तुळजापूर पोलिसांनी अटक केली. या दोघांचीही पोलीस कोठडी संपताच, तुळजापूरच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र, यापूर्वीच्या गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी असल्याने न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे रोचकरी बंधुंचा जिल्हा कारागृहात मुक्काम ठरला. न्यायालयीन कोठडी भोगत असलेल्या रोचकरी बंधुंनी जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केलेला आहे. त्यावर दोन दिवस सुनावणी झाली. मात्र, निर्णय झालेला नाही. दोन्हीकडील युक्तिवाद झाले आहेत. आता पुन्हा २ सप्टेंबर रोजी या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालयात सुनावणी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे रोचकरी बंधुंना या दिवशी दिलासा मिळतो की, कारागृहातील मुक्काम वाढतो, याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.