भूम : परंडा राेडवरील मशीद जवळ रस्त्यावरील खड्डे दाेन ते अडीच महिन्यांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बुजविण्यात आले हाेते. परंतु, अवघ्या काही दिवसांतच ते खड्डे पुन्हा जैसे थे झाले आहेत. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. ही गैरसाेय लक्षात घेऊन एमआयएमचे तालुकाप्रमुख एजाज काझी यांनी स्वखर्चाने खडीच्या साहाय्याने खड्डे बुजविले.
भूम-परांडा या रस्त्याचे काम मागील दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत झाले आहे. मात्र, काम दर्जेदार न झाल्यामुळे की काय, रस्त्यावरील खड्डे पुन्हा जैसे थे झाले आहेत. थाेडाबहुत पाऊस झाला तरी सदरील खड्ड्यांना डबक्याचे स्वरूप येते. अशा खड्ड्यांचा अंदाज वाहनधारकांना येत नाही. त्यामुळे सातत्याने लहान-माेठे अपघात होत आहेत. हा प्रश्न समाेर आल्यानंतर एमआयएमचे तालुका अध्यक्ष एजाज काजी , सामाजिक कार्यकर्ते शहनावाज पिरजादे व शमशीर पठाण यांनी रस्त्यावरील खड्ड्यामध्ये स्वखर्चाने खडी टाकून खड्डे बुजविले आहेत. त्यामुळे या भागातून ये-जा करणाऱ्या लाेकांची गैरसाेय दूर झाली आहे.
चाैकट...
शिवशंकर नगर, इंदिरा नगर या भागातील लाेकांसाठी हा एकमेव रस्ता आहे. त्यामुळे या मार्गावर सातत्याने वर्दळ असते; मात्र, हा रस्ता पूर्णत खड्डेमय बनला आहे. हीच बाब लक्षात घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले. संबंधित प्रशासनाने हा प्रश्न गांभीर्याने घ्यावा.
- एजाज काजी, तालुका अध्यक्ष, एमआयएम.
रस्त्यावरील खड्ड्यांबाबत तक्रारी आल्या आहेत. गुत्तेदार यांनाही कळविण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत खड्डे बुजविण्यास सुरुवात हाेईल.
-एस. सी. मुडे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.