ईट : भूम तालुक्यातील ईटपासून जवळच असलेल्या नागेवाडी येथील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. अनेक रस्त्यावर चिखल व पाणी साचल्याने गावकऱ्यांना वाट शोधताना कसरत करावी लागत आहे.
ईटपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर नागेवाडी हे गाव आहे. या गावामध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून अंतर्गत रस्त्याचे व नालीचे काम झालेले नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असून, सर्व रस्ते चिखलमय झाले आहेत. ग्रामस्थांच्या घरातील सांडपाणी व पावसाचे पाणी रस्त्यावर येत असल्याने रस्त्यावर जागोजागी पाण्याची डबकी साचली आहेत. गावांतर्गत रस्त्याचे काम करण्यासाठी या ग्रामपंचायतीकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या दहा वर्षांपासून गावांतर्गत या रस्त्याचे काम ग्रामपंचायतीकडून केले गेले नाही. तसेच त्याची साधी मुरुम टाकूनही दुरुस्तीही झाली नाही. सांडपाण्याची व्यवस्था नसल्याने रस्त्यावर जागोजागी पाण्याची डबकी साचली असून, याच यातूनच रस्ता शोधावा लागत आहे. त्यामुळे याची तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी कृष्णा लांडे यांनी केली आहे.