उमरगा : सालेगाव चैत्यविहाराच्या उर्वरित कामासाठी तत्काळ निधी देण्याची आग्रही मागणी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सोमवारी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली असून, लवकरात लवकर निधी देण्याचे आश्वासन मुंडे यांनी दिल्याचे आ. चौगुले यांनी सांगितले. त्यामुळे चैत्यविहाराचे उर्वरित काम लवकरच मार्गी लागणार आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त ‘निवडक जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे’ या योजनेंतर्गत लोहारा तालुक्यातील सालेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी एकूण १४ कोटी ७२ लक्ष रुपयांचे अंदाजपत्रक संबंधित विभागाकडे सादर करण्यात आले होते. सध्या यापैकी ५ कोटी ९४ लक्ष १८ हजार २७५ इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, उर्वरित ८ कोटी ७८ लाख २७ हजार ६३४ रुपये तत्काळ मंजूर करावेत, अशी विनंती आ. ज्ञानराज चौगुले यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.
याच भेटीत त्यांनी उमरगा-लोहारा तालुक्यातील मागासवर्गीय वस्त्यांतर्गत मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत निधी देण्याचीही मागणी केली. याबाबत मंत्री धनंजय मुंडे यांनी लवकरात लवकर कार्यवाही करून निधीची तरतूद करण्याची ग्वाही दिल्याचे आ. चौगुले यांनी सांगितले.