कळंब : येथील उपजिल्हा रुग्णालय हे कोविड रुग्णालयामध्ये परावर्तित केल्यामुळे शासकीय कोविड लसीकरण केंद्र शहरातील सावरगाव पुनर्वसन भागातील डॉ. रामकृष्ण लोंढे यांच्या विजया नर्सिंग होम येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. शुक्रवारपासून येथे लसीकरण सुरू करण्यात आले आहे.
कोरोना माहामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, येथील उपजिल्हा रुग्णालय हे कोविड रुग्णालयामध्ये परावर्तित केल्यामुळे येथे कोविड पेशंटची गर्दी वाढत आहे. तसेच कोविड टेस्टिंगसाठीही रुग्णसंख्या वाढली आहे. यामुळे येथील लसीकरण इतर ठिकाणी हालविण्यासंदर्भात हालचाली सुरू होत्या. तसेच विविध संघटनांनी या संदर्भात उपाययोजना करण्याची मागणी लावून धरली होती. लसीकरणाच्या जागेची अडचण दूर करण्यासाठी डॉ. रामकृष्ण लोंढे आणि डॉ. अभिजित लोंढे या पिता-पुत्रांनी त्यांचे स्वतःचे विजया नर्सिंग होम हे कोविड लसीकरणासाठी विनामूल्य उपलब्ध करून दिले आहे.
नागरिकांनी शासनाच्या दिशा निर्देशांचे पालन करून मोफत लसीकरण करून घ्यावे व आपले, आपल्या कुटुंबियांचे तसेच इतरांचेही कोरोना माहामारीपासून संरक्षण करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या केंद्रातील लसीकरणाचा पहिला डोस कौशल्या बब्रुवान गोरे यांना परिचारिका शैलजा वाघमारे यांच्याहस्ते देण्यात आला.
लसीकरण केंद्रास विभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ, वैद्यकीय अधीक्षक डॉ. जीवन वायदंडे, कळंब ‘आयएमए’ अध्यक्ष डॉ. कमलाकर गायकवाड, सचिव डॉ. सत्यप्रेम वारे, रोटरी अध्यक्ष डॉ. गिरीश कुलकर्णी, सचिव डॉ. सचिन पवार आदींनी भेट देऊन समाधान व्यक्त केले.
कॅप्शन -
कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड लसीकरण केंद्र शहरातील सावरगाव पुनर्वसन भागातील विजया नर्सिंग होममध्ये स्थलांतरित करण्यात आले. याठिकाणी पहिल्यादिवशी नागरिकांनी लसीकरणास चांगला प्रतिसाद दिला.