वाशी : ऐन काढणी हंगामातच सोयाबीनचे दर कमालीचे खाली आले असून, त्यातच पीक काढणीसाठी मजुरांनीही एकरी चार हजार रुपये दर केला आहे. यामुळे शेतकरी चांगलाच संकटात सापडल्याचे दिसत आहे.
वाशी तालुक्यात प्रत्येक वर्षी सोयाबीन क्षेत्रात वाढ होत असल्याने, या तालुक्याची ओळख आता सोयाबीनचे आगार अशी होऊ लागली आहे. तालुक्याचे खरीप पेरणीयोग्य क्षेत्र ४६ हजार ८१ हेक्टर असून, यामध्ये ३७ हजार ३२६ हेक्टरवर एकट्या सोयाबीनचा पेरा झालेला आहे. त्या खालोखाल उडीद, मूग आदी खरीप पिकाचा पेरा करण्यात आला आहे. सोयाबीनचे पीक जोमात असताना, गेल्या महिन्याभरापूर्वी पावसाने तब्बल तीन आठवडे उसंत खाल्ली. परिणामी, माळरानावरील सोयाबीनची पिके जळून गेली, तसेच चांगल्या रानावरील पिकाच्या उत्पादनात घट निर्माण झाली.
जोपर्यंत शेतात सोयाबीन होते, तोपर्यंत सोयाबीनचा दर उच्चांकी म्हणजेच १० हजारीपार गेलेला होता. गेल्या आठवड्यापासून सोयाबीनच्या काढणीस प्रारंभ झाला असून, शेतकरी राशी करून ते बाजारात विक्रीला आणण्यासाठी धावपळ करीत आहेत, परंतु ऐन सोयाबीन बाजारात आणण्याच्या वेळेतच दिवसाकाठी त्याचा भाव कमी होऊ लागला़ आहे. २० सप्टेंबर रोजी ७ हजार रुपयांनी विकणारे सोयाबीन हे २२ सप्टेंबर रोजी ६ हजार १३० रुपये दराने विक्री होऊ लागले आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक चांगलाच अडचणीत सापडल्याचे दिसत आहे.
चौकट........
काढणीसाठी जालना जिल्ह्यातील मजूर
तालुक्यात सोयाबीन काढणीसाठी जालना जिल्ह्यातील मजूर दाखल झाले आहेत. यामुळे काढणीला गती येणार आहे. यंदा पेरणीपूर्वी सोयाबीनच्या बियाण्याचा तुटवडा निर्माण झाला होता. १० हजार रुपये क्विंटल या दराने सोयाबीनचे घरगुती बियाणे शेतकऱ्यांना खरेदी करावे लागले होते, शिवाय पेरणीनंतर त्यावर अनेक विघ्ने पडल्याने, यावर मात करत शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पीक बऱ्यापैकी आणले. अस्मानी संकटावर मात केली. मात्र, आता सुलतानी संकटाच्या तावडीत सोयाबीन सापडले आहे. खासगी व्यापारी सोयाबीनच्या उतरत्या दरामुळे खरेदी करण्यास अनुत्सुक आहेत. सध्या येथे लातूर येथील टीना मिलचे सोयाबीन खरेदी केंद्र चालू असून, या केंद्राचा येथील दर बुधवारी प्रतिक्विंटल ६ हजार १३० रुपये एवढा काढण्यात आला होता़
कोट.......
शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पीक विक्री करण्यासासाठी गडबड करू नये. आवश्यकता असेल, तेवढेच सोयाबीन विक्री करून सध्याची गरज भागवावी, तसेच पुढील वर्षी सोयाबीन पेरण्यासाठी बियाणे राखून ठेवावे.
- संतोष कोयले, तालुका कृषी अधिकारी
सोयाबीनची खरेदी तूर्तास बंद असून, सोयाबीन विक्रीस आणताना शेतकरी गडबड करत आहेत. सोयाबीनमध्ये आर्द्रता मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे विक्री करण्यास अडचण निर्माण होत आहे.
- मुकुंद शिंगणापुरे, अध्यक्ष, व्यापारी संघटना, वाशी.