पाथरुड : भूम तालुक्यातील अंभी महसूल मंडळात येणाऱ्या पाथरुड परिसरात सलग तिसऱ्या दिवशीही पावसाने चांगली हजेरी लावल्याने या भागातील खरीप पीके पाण्याखाली गेली असून, काढणी सुरु असलेल्या उडीद पिकाचे मोठे नुकसान झाले. तसेच शेतातील सोयाबीन, कांदा ही प्रमुख पिकेही ही पाण्याखाली गेल्याने प्रामुख्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
अंभी महसूल मंडळात शनिवारी रात्री १०२ मिलिमीटर पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद झाली. रविवारी ४० मिलिमीटर पाऊस झाला तर सोमवार, मंगळवारीही पाऊस सुरूच ोहता. दररोज होणाऱ्या पावसाने परिसरातील तलाव भरण्याच्या मार्गावर असून, विहिरी फुल्ल झाल्या आहेत. मात्र दुसरीकडे या जोरदार पावसाने खरिपातील काढणी सुरु असलेल्या उडदाच्या पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. सततच्या पावसाने उडीदाला कोंब फुटले आहेत. काढलेला उडीदही पाण्याखाली गेला आहे. शेतात उभे असलेले सोयाबीन, कांद्याचे पीकही पाण्यात गेल्याने अंभी महसूल मंडळातील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
070921\20210907_113321.jpg
फोटो: पावसाने अंभी महसूल मंडळातील पाण्यात गेलेले कांद्याचे पीक