उस्मानाबाद शहरातील किरकोळ टोळ्या सातत्याने वर तोंड काढू लागल्या आहेत. साध्या-साध्या कारणांवरून दोन गट आपसांत भिडण्याचे प्रकार वारंवार घडून येत आहेत. असाच एक प्रकार मंगळवार व बुधवारच्या मध्यरात्री घडून आला. येथील काळा मारुती चौकात सातत्याने एकमेकांशी वाद घालणारे दोन गट आमनेसामने आले. त्यांच्या शिवीगाळीनंतर तुफान राडा सुरू झाला. एकमेकांच्या अंगावर धावून जात दगड, काठ्यांनी हाणामारी सुरू झाली. भर मध्यरात्री आरडाओरडा, गोंधळ सुरू झाल्यानेे या भागातील नागरिक जागे झाले. दरम्यान, काळा मारुती चौक ते मारवाड गल्ली या भागात धिंगाणा घालणाऱ्या या तरुणांनी रस्त्यावर उभ्या वाहनांनाही लक्ष्य केले. दगड, फरशीने जवळपास तीन वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. तसेच दुकानांच्या शटरवरही दगडफेक करण्यात आली. त्यामुळे नागरिकांच्या दहशतीत आणखीच वाढ झाली. दरम्यान, हा प्रकार सुरू असताना पोलिसांना दूरध्वनीवरून माहिती देण्यात आली होती. यानंतर पोलीस घटनास्थळावर पोहोचताच गोंधळ घालणाऱ्या तरुणांनी पळ काढला. मात्र, यात एक तरुण पोलिसांच्या हाती लागला. पोलीस त्याच्याकडे चौकशी करीत असून, हाणामारीचे कारण व त्यात सहभागी अन्य तरुणांची माहितीही घेतली जात आहे. बुधवारी रात्रीपर्यंत यातील आणखीही काही युवकांना ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे.
काळा मारुती चौकात दोन गटांत राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:00 IST