कळंब : काेव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस उपलब्ध होत नसल्याने त्या लसीचा पहिला डोस घेतलेले नागरिक संभ्रमावस्थेत आहेत. याची गांभीर्याने दखल घेऊन काेव्हॅक्सिनचा दुसरा डोस उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी स्फूर्ती फाऊंडेशनने पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
लसीकरण सुरु झाल्यानंतर ४५ वयाच्या पुढील अनेक नागरिकांनी काेव्हॅक्सिन या लसीचे डाेस घेतले. त्यांच्या पहिला डोसचा कार्यकाल संपून गेला आहे. त्यामुळे दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना काळजी वाटत आहे. एकट्या कळंब तालुक्यात अशा लोकांची संख्या दोन हजारांवर आहे. हा डोस कधी उपलब्ध होणार याबाबत प्रशासन सांगत नाही. आरोग्य विभागाकडेही याची माहिती नसल्याने संभ्रम वाढला आहे.
याची गांभीर्याने दखल घेऊन आठवड्यातील तीन दिवस फक्त ४५ वर्षांपुढील नागरिक व दुसरा डोस घेणारे यांच्यासाठी तत्काळ नियोजन कार्यवाही करण्याची सूचना संबंधितांना करावी, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर स्फूर्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी गिड्डे पाटील, सचिव मकरंद पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.