उमरगा : येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात पावसाचे पाणी साचले असून, येथील साहित्य पहिल्या मजल्यावर शिफ्टिंग करण्यात येत आहे.
उमरगा तहसील कार्यालयाची जुनी इमारत कालबाह्य झाल्यामुळे पाठिमागे असलेल्या खुल्या जागेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली ठेकेदारामार्फत नवीन इमारत बांधण्यात आली. यासाठी एक कोटीपेक्षा अधिकची रक्कम खर्च करण्यात आली. मात्र, नव्याने उभारलेल्या या इमारतीत प्रत्येक वर्षी पावसाळ्यात तळमजल्यात पाणी साचते. हे कार्यालय पाणीमुक्त होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या माध्यमातून ३७ लाख मंजूर झाले. याची निविदा प्रक्रिया सुरू होणार असल्याचे तत्कालीन तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी तीन वर्षांपूर्वी सांगितले होते. परंतु, अजूनही हे काम मार्गी लागले नाही.
पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नसल्याने तळमजल्यातील पुरवठा विभागात पावसाळ्यात जमा होणाऱ्या पाण्यामुळे कामकाजावर परिणाम होत आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी पुरवठा विभागाचे सर्व दप्तर पहिल्या माळ्यावर स्थलांतरित करण्याची नामुश्की प्रशासनावर येत आहे.