कळंब : वाहने चिखलात किंवा खड्ड्यात फसण्याचे प्रकार शेतरस्ते, कच्च्या रस्त्यावर पाहायला मिळतात. परंतु, कळंब तालुक्यातील राज्यमार्गावर वाहन फसल्याचा ‘न भूतो...’ असा अनुभव वाहनचालकाबरोबरच त्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी अनुभवला. जंपिंग ट्रॅक म्हणून जिल्हाभर ओळख बनलेल्या कळंब-मोहा-येडशी या राज्यमार्गावर मंगळवारी ही घटना घडली.
कळंब तालुक्यातील जवळपास २५ गावांना जिल्हा व तालुका मुख्यालयाना जोडणारा हा मुख्य मार्ग आहे. मोहा, गौर, दहिफळ, वाघोली ही मोठी गावे याच मार्गावरून येतात. शिक्षण, आरोग्य, व्यापार आदी प्रमुख कारणांसाठी हा मार्ग या २५ गावांसाठी महत्त्वाचा आहे. मागील पाच-सहा वर्षांपासून या राज्यमार्गाची अवस्था शेतरस्त्याहून बिकट बनली आहे. अनेकांनी या रस्त्याचा वापर करणेच सोडून दिले आहे. कळंब गाठायचे असेल, तर येरमाळा रोड किंवा ढोकी रोड मार्गे प्रवास केला जातो आहे. अंतर लांब पडत असले तरी, सुरक्षित प्रवास होत असल्याने वाहनचालक त्या मार्गाने प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. मध्यंतरी सार्वजनिक बांधकाम विभागाने दरवर्षीप्रमाणे लाखो रुपये खर्चून रस्त्याची डागडुजी करून दाखवली. पण, काम कोठे झाले हे आता विचारले, तर ते ना अधिकाऱ्यांना दाखविता येईल, ना गुत्तेदारांना, अशी त्या कामाची अवस्था बनली आहे.
येडशी ते शेलगाव (ज) व पुढे ब्रम्हाचीवाडी येथील काही भाग तीन महिन्यांपासून संबंधित कंत्राटदाराने नूतनीकरणासाठी हाती घेतला आहे, तो अजूनही पूर्ण होऊ शकलेला नाही. पावसामुळे काम रखडल्याचे बांधकाम विभाग सांगत असला तरी, ऐन पावसाळ्यात काम का सुरू केले, असा प्रश्न आता त्या मार्गावरील ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.
एकूणच कळंब-मोहा-येडशी हा ३० कि.मी.चा संपूर्ण राज्यमार्ग खड्ड्यात गेल्याचे चित्र आहे. या पावसाळ्यात खड्ड्यांची संख्या वाढली आहे. तसेच आहेत त्या खड्ड्यांची खोली व रुंदीही वाढली आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीस धोकादायक असल्याचा सूचना फलक बांधकाम विभागाने लावण्याची मागणीही पुढे येते आहे.
चौकट -
खड्डा चुकविला, पिकअप् फसला !
बुधवारी दुपारी लातूर जिल्ह्यातील एक पिकअप् वाहन अवजड साहित्य घेऊन या मार्गावरून जात होते. वाघोली गावाजवळ आल्यानंतर एक खड्डा चुकविण्यासाठी त्याने बाजूने वाहन नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे त्याचा अंदाज चुकला व राज्यमार्ग असलेल्या रस्त्यातील दुसऱ्या खड्ड्यात त्याचे वाहन अडकले. त्यामुळे वाहतूकही काही काळ ठप्प झाली होती. त्यानंतर ट्रॅक्टरने ते पिकअप् वाहन बाहेर काढले व रस्ता मोकळा केला. त्यामुळे हा राज्यमार्ग आहे की शेतरस्ता, असा प्रश्न आता विचारला जात आहे.
ओएफसी लाईनमुळेही नुकसान !
याच मार्गाच्या बाजूने काही महिन्यांपूर्वी दूरध्वनीची वायर टाकण्यासाठी चर खोदली होती. बहुतांश ठिकाणी साईडपट्ट्या खोदून ही वायर टाकली. परंतु, ते खड्डे संबंधित कंत्राटदाराने व्यवस्थित न बुजविल्याने त्यामध्येही वाहने फसत आहेत. आता कंत्राटदार काम करून निघून गेला, मग ही वाहनांची फसाफशी थांबणार कशी, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.