कळंब : येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्ण कल्याण समितीची बैठक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यावेळी रुग्णांच्या समस्या विषयावर चर्चा करून उपाययोजना सुचविण्यात आल्या.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना टेस्ट वाढविणे संदर्भात चर्चा होऊन खासगी रुग्णालयात कोविड टेस्टींला परवानगी देणे व कोविड लसीकरणासाठी खासगी हॉस्पिटलची मदत घेण्यासंदर्भात चर्चा केली. वरील दोन्हीही गोष्टी लवकरच अंमलात आणण्यासाठीच्या उपाययोजना हाती घेण्यात येतील, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.
कळंब येथे ट्रॉमा केअर सेंटर, वाढीव खाटांचे रुग्णालय लवकरच कार्यान्वित करण्यासाठी योग्य ती पावले उचलली जातील, असेही पाटील म्हणाले. यावेळी डॉ. पाटील यांचा आय. एम. ए. च्या महाराष्ट्र राज्य शाखेतर्फे प्रदेशाध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जागतिक महिला दिनानिमित्त महिला डॉक्टर्स डॉ. शोभा वायदंडे, डॉ. भक्ती गिते, डॉ. मंजुश्री शेळके, डॉ. मिरा दशरथ, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, बालविकास प्रकल्प अधिकारी सांगळे, परिचारिका शैलजा वाघमारे, गोसावी, गोरे आदींचा प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बैठकीसाठी डॉ. जीवन वायदंडे, डॉ. पुरूषोत्तम पाटील, डॉ. निलेश भालेराव, डॉ. सुधीर औटी, परशुराम कोळी आदींनी पुढाकार घेतला.