तेर : उस्मानाबाद तालुक्यातील तेरसह परिसरातील गावांमध्ये मागील महिनाभरापासून डेंग्यूसदृश आजाराने डोके वर काढले आहे. यामध्ये सर्वाधिक लहान मुलांचा समावेश आहे. परिणामी उपचारासाठी खासकरून खासगी दवाखान्यांत गर्दी हाेऊ लागली आहे. त्यामुळे शासकीय आराेग्य यंत्रणा सतर्क हाेणार कधी? असा सवाल या निमित्ताने उपस्थित हाेत आहे.
तेर गावाची लाेकसंख्या सुमारे २२ हजारांच्या घरात आहे. या गावासह परिसरात मागील महिनाभरापासून डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ हाेऊ लागली आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक आढळून येत आहे. रोगप्रतिकार शक्ती कमी होणे, ताप, थंडी आदी लक्षणे रुग्णांमध्ये सर्रास पहावयास मिळत आहेत. त्यामुळे खासगी दवाखाने अक्षरश: फुल्ल दिसून येत आहेत. असे असतानाही शासकीय आराेग्य यंत्रणा मात्र सुस्त आहे. कुठल्याही स्वरूपाच्या उपाययाेजना गावात दिसत नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांतून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ग्रामपंचायतीकडूनही फारसे प्रयत्न हाेताना दिसत नाहीत, हे विशेष.
चाैकट...
तेरमध्ये गेली काही दिवसांपासून डासांचे प्रमाण वाढले असून ग्रामपंचायतीच्यावतीने एकवेळ फवारणी केली आहे. परंतु, डासांचे प्रमाण कमी झालेले नाही. अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने ग्रामस्थांना दुर्गंधीचा सामना करावा लागताे. अशा परिसरात आराेग्य यंत्रणेने फवारणी करणे गरजेचे आहे. तसेच जनजागृतीवरही भर असणे आवश्यक आहे. परंतु, तसे हाेताना दिसत नाही.