उस्मानाबाद : शहरातील जाधववाडी राेडवर माॅर्निंग वाॅकसाठी जाणाऱ्या महिलांसह मुलींची छेड काढणाऱ्या राेडराेमिओला नातेवाइकांसह नागरिकांनी भल्या सकाळी धू-धू धुतले. हा तरुण भूम तालुक्यातील भाेगलगाव येथील आहे. ताे शिक्षणासाठी उस्मानाबादेत आल्याचे त्याने सांगितले. याप्रकरणी उस्मानाबाद शहर पाेलीस ठाण्यात महिलेच्या तक्रारीवरून बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उस्मानाबाद शहरातील जाधववाडी माॅर्निंग वाॅकसाठी महिलांसह तरुणी माेठ्या संख्येने जातात. नेहमीप्रमाणे मंगळवारी काही महिला माॅर्निंग वाॅकसाठी गेल्या हाेत्या. याचवेळी तेथे थांबलेल्या एका २० ते २२ वर्षीय राेडराेमिओने एका विवाहित महिलेची छेड काढली. संबंधित महिलेने घरी गेल्यानंतर सर्व प्रकार आपल्या पतीकडे कथन केला. यानंतर बुधवारी सकाळीही सदरील राेडराेमिओ तिथे आला. यावेळी विवाहितेच्या नातेवाइकांसह लाेकांनी त्यास पकडून धू-धू धुतले. यानंतर त्याला नाव विचारले असता, सूरज गायकवाड असे नाव त्याने सांगितले. ताे भूम तालुक्यातील भाेगलगाव येथील रहिवासी आहे. शिक्षणासाठी ताे उस्मानाबादेत आलेला आहे. यानंतर नागरिकांनी त्यास शहर पाेलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी संबंधित राेडराेमिओविरुद्ध उस्मानाबाद ग्रामीण पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.