कळंब : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलितवस्ती सुधार योजना व दलितेत्तर वस्ती सुधार योजनेंतर्गत प्राप्त होणाऱ्या अनुदानामध्ये राजकीय द्वेषापोटी कामे हाती घेण्यात आले नसल्याने, हा भाग विकासापासून वंचित राहिलेला आहे. विरोधकांच्या प्रभागातील कामाचा समावेश करून प्रशासकीय मान्यता देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते शिवाजी कापसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. कापसे यांच्या मागणीमुळे न.प.मध्ये पुन्हा सत्ताधारी व विरोधकांमध्ये निधीवरून वातावरण पेटण्याची चिन्हे आहेत.
कळंब नगरपरिषदेने २०२०-२०२१ मध्ये प्राप्त होणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलितवस्ती सुधार योजना व दलितेत्तर वस्ती सुधार योजनेंतर्गत विविध विकास कामे हाती घेण्याचा ठराव मंजूर करून त्यास मान्यता दिली आहे. त्या ठरावाप्रमाणे न.प.ने कामाची अंदाजपत्रके तयार करून त्यावर नगरअभियंता व मुख्याधिकारी यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. मात्र, नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे यांनी विरोधकांच्या प्रभागातील अंदाजपत्रकावर सह्या केलेल्या नसल्याने त्या कामाची तांत्रिक मान्यता मिळालेली नाही, असे निवेदनात म्हटले आहे. कळंब न.प.मध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व असून, शिवसेना विरोधी बाकावर आहे. विरोधकांच्या सहा नगरसेवकांच्या प्रभागात कोणतीही विकास कामे हाती घेण्यात आलेली नाहीत. त्यामुळे विरोधकांच्या ज्या प्रभागामध्ये कामे झालेली नाहीत, अशा ठिकाणची मुख्याधिकारी यांच्याकडून माहिती घेऊन सदरील प्रभागात कामे हाती घेण्याबाबतच्या सूचना द्याव्यात. विरोधकांच्या प्रभागामधील कामांचा समावेश करूनच प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात याव्यात, अशी विनंती जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्याची माहिती शिवसेनेचे गटनेते शिवाजी कापसे यांनी दिली.
चौकट-
अनेक भागांत निधीच नाही!
शहरातील काही ठरावीक भागांतच सध्या निधीचा स्रोत चालू आहे. त्या भागात कामे करायला हरकत नाही, परंतुु इतर भागही शहर हद्दीतच आहे. त्यांनाही भौतिक सुविधा हव्या आहेत. याचा विसर सत्ताधाऱ्यांना पडला आहे का, असा संतप्त सवालही कामे न झालेल्या भागातील नागरिक विचारत आहेत.
कोट....
ज्यांना आपापल्या प्रभागात कामे करायची आहेत, त्यांनी परिपूर्ण प्रस्ताव द्यावा, असा निरोप आम्ही दिला होता, परंतु विरोधकांनी कामाची यादी आणून दिली. आपल्या प्रभागात काम करायचे असेल, तर त्याचा परिपूर्ण प्रस्ताव त्यांनी द्यायला हवा होता किंवा न. प.च्या संबंधित विभागाकडून तो तयार करून घ्यायला हवा होता. माझ्याकडे सह्यांसाठी जे प्रस्ताव आले, त्यावर सह्या केल्या आहेत, परंतु जे आलेच नाहीत, त्यावर सह्या करण्याचा प्रश्नच नाही.
सुवर्णा मुंडे, नगराध्यक्षा