लोकमत न्यूज नेटवर्क
वाशी : येथे आयोजित वाशी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत ओंकारेश्वर रायडर्स संघाने विजेतेपद पटकावले तर स्पीड रायडर्स संघ उपविजेता ठरला. विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
येथील पृथ्वीराज चेडे, मनोज येताळ, सुरज येताळ, तुषार उंदरे, धनंजय चौधरी, नीलेश मोळवणे व त्यांच्या मित्रमंडळींच्या पुढाकारातून या स्पर्धा घेण्यात आल्या. यासाठी तालुक्यातील क्रिकेट संघांना बोलावून चिठ्ठ्यांव्दारे आठ संघाची निवड करून साखळी पद्धतीने सामने खेळविण्यात आले होते़. यावेळी आयोजकांकडून विजेत्या संघाला ३१ हजार रुपये, उपविजेत्या संघाला २१ हजार रूपयांसह अन्य वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली.
येथील पारा रोडवरील कन्या प्रशालेच्या मैदानावर आठ दिवस या स्पर्धा रंगल्या. स्पर्धेचा अंतिम सामना ओंकारेश्वर रायडर्स विरूद्ध स्पीड रायडर्स यांच्यात झाला. ओंकारेश्वर रायडर्सने बाजी मारत विजेतेपद पटकावले. उपविजेतेपद स्पीड रायडर्स संघाला मिळाले. या स्पर्धेत पंच म्हणून दीपक निर्मळे, सुहास कवडे यांनी काम पाहिले. शिवसेनेचे नेते प्रशांत चेडे, विकास मोळवणे, पृथ्वीराज चेडे, माजी नगराध्यक्ष नागनाथ नाईकवाडी, माजी उपनगराध्यक्ष प्रसाद जोशी, शिवहार स्वामी, दत्तात्रय कवडे यांच्या उपस्थितीत विजेत्या संघांना बक्षीस देण्यात आले.