पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथे मांजरा नदीलगत असलेली स्मशानभूमी नदीला पूर आल्यानंतर पाण्याखाली जाते. अशा वेळी गावात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधीसाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने येथे पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
वाशी तालुक्यातील पारगाव हे उस्मानाबाद जिल्ह्याचे प्रवेशद्वार असून, औरंगाबाद - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मांजरा नदीच्या काठी वसलेले आहे. गावची लोकसंख्या जवळपास सहा हजार असून, ग्रामपंचायत सदस्य संख्या तेरा आहे. येथे एक सार्वजनिक स्मशानभूमी आहे. गावात कोणीही मयत झाल्यास याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येतात. मात्र, ही जागा अपुरी असल्यामुळे एकाच दिवशी किंवा सलग दोन दिवशी दोन मृत्यू झाल्यास एका मृतदेहावर स्मशानभूमीच्या बाजूला मोकळ्या जागेत अंत्यसंस्कार करावे लागतात. त्यामुळे येथे आणखी एका स्मशानभूमीचे बांधकाम व्हावे, अशी ग्रामस्थांची जुनी मागणी आहे.
दरम्यान, सध्या उपलब्ध असलेली स्मशानभूमी मांजरा नदीकाठी असून, मांजरा नदीला पूर आल्यानंतर ती पाण्याखाली जाते. अशा वेळी गावात अंत्यसंस्कारासाठी कुठलीच पर्यायी जागा उपलब्ध नाही. गावालगत शेतजमीन असलेले लोक त्यांच्या शेतात पत्र्याचे शेड उभारून अंत्यसंस्कार करतात; परंतु ज्यांच्याकडे जागा नाही ते जुन्या डांबरी रस्त्यावरच मांजरा नदीवरील पुलाजवळ तर काही जण गावालगत असलेल्या फॉरेस्टमध्ये अंत्यसंस्कार करतात. त्यामुळे येथे पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची गरज ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
चौकट........
पूर परस्थितीदरम्यान अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीची नितांत गरज आहे. मात्र, ही समस्या आजवर कोणी मांडली नव्हती. या समस्येला प्राधान्य देत येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत सर्व सदस्यांना विचारात घेऊन नवीन स्मशानभूमीसाठी प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावा केला जाईल.
- महेश कोळी, सरपंच
सहा हजार लोकसंख्या असलेल्या गावात एकच स्मशानभूमी असल्याने आधीच अंत्यसंस्कार करण्यासाठी मोठ्या अडचणी येत होत्या. मांजरा नदीच्या काठावर असलेली स्मशानभूमी पूर आल्यानंतर पाण्याखाली जाते. अशा वेळी अंत्यसंस्कार करताना मोठी अडचण निर्माण होते. त्यामुळे आता पुराचे पाणी येणार नाही, अशा ठिकाणी फक्त आपत्कालीन परिस्थितीसाठी स्मशानभूमी होणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने पाठपुरावा करू.
- कॉ. पंकज चव्हाण, उपसरपंच