उमरगा : भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर मराठवाडयाला निजामाच्या हूकुमशाहीतून मुक्त करण्यासाठी एक वर्षे अधिक वेळ लागला. या स्वातंत्र्यलढ्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील नाईचाकूर गावाचा सहभाग देखील महत्त्वपूर्ण होता.
१९४७ साली हैद्राबाद संस्थानात सर्वत्र जंगल सत्याग्रह करण्यात आले. मोठ्या संख्येने विविध ठिकाणी सत्याग्रह झाले. याच कालावधी साताऱ्याचे क्रांतिसिंह नाना पाटील यांची नाईचाकूर येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यात पुढील आंदोलनाची दिशा निश्चित ठरवण्यात आली. यानुसार काही दिवसात गावातील युवकांनी शिंदीचे बन तोडून फेकून दिले. हजारो रूपयाचे उत्पन्न रातोरात नष्ट केले. या सोबत शिंदी जमा करणारी केंद्रे नष्ट केली, पैसा लुटून स्वातंत्र्याच्या कामासाठी वापर केला.
नाईचाकूर गावात मोठे पोलिस ठाणे होते. निजाम सरकारने आपल्या संस्थानातील नागरिकांना हत्यार वापरण्यास बंदी घातली होती. यावेळी नाईचाकूर पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक घरातील झडती घेऊन हत्यारे जप्त करण्यात येवू लागली. तीच हत्यारे रझाकार संघटनेला पुरविली जाणार होती. मात्र, १५ जानेवारी १९४८ रोजी रात्री १२ च्या सुमारास पंचक्रोशीतील क्रांतीकारकांनी हल्ला करून पोलिस ठाणे लुटले. याचे नेतृत्व हाडोळीचे मोहन पाटील, नाईचाकूर येथील गोविंद पवार, शाहूराज जाधव, राम पवार, व्यंकट माने यांनी केले होते.
यासोबतच झेंडा सत्याग्रह, हात बॉंब तयार करणे, आलुरच्या निजामी मिलिटरी ठाण्यावर हल्ला, घोळसगाव जेल मधील पोलिसांवर हल्ला, व्यापारी लूट, घोरवडी रझाकार केंद्रावर हल्ला, अशा अनेक आंदोलनात नाईचाकूर गावातील गोविंद पवार, शाहूराज जाधव, व्यंकट जयवंता पवार,माणिक (कारभारी) देवराव पवार, तुळशीराम साळुंके (व्हगाडी), सुग्रीव हणमंत पवार, जयपाल आदप्पा कांक्रबे, सदानंद सनातन, माणिक पवार, शंकर लंकडे, काॅ. हिरा पवार, नामदेव पवार, सोपान माने, महादा सनातन, किसन तुकाराम पवार, नागनाथ पवार, नाभीराज जमालपुरे, माणिकराव पवार, बाबूसिंह पवार, शंकर सनातन, तुळशीराम काळे, बाबाराव भोसले, किसन महादेव पवार, व्यंकट भाई माने, किसन तात्याराव पवार, व्यंकट गोपाळ पवार, राम बापू पवार, मनोहरसिंह पवार, माणिक सगर, बाबू पांडुरंग इटुबोने तुकाराम इटुबोने, रंगराव कदम, डिगबंर कुलकर्णी, पांडूरंग बाबळसुरे, तुळशीराम साळुंके आदी क्रांतीकारकांनी मोलाचे योगदान दिले. अशा गावोगावी चाललेल्या आंदोलनाचा लढ्याचा परिणाम म्हणजे १३ ते १७ सप्टेंबर १९४८ या कालावधीत १०९ तासाचे ऑपरेशन कबड्डी, पोलो, टक्कर ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर हैद्राबाद संस्थानच्या निजामाने शरणागती पत्करली आणि हैदराबाद संस्थान भारतात विलिन करून घेतले.
इस्माईल मुल्लाला मध्यरात्री ठार केले
इस्माईल मेहबूब मुल्ला हा रझाकाराचा विश्वासू व्यक्ति होता. गावातील महिला, क्रांतीकारकांच्या घरातील लोकांना तो त्रास देवू लागला. महिलांची अब्रु लुटू लागला. यामुळे क्रांतीकारक प्रचंड चिडले १० जून १९४८ रोजी मध्य रात्री त्याला ठार करण्यात आले. या मध्ये रामचंद्र जहागिरदार, तुळशीराम सांळुके, तुळशीराम धनगर सहभागी होते.