उस्मानाबाद : जिल्हा परिषद लघू पाटबंधारे विभागाचा कारभार मागील अनेक महिन्यांपासून प्रभारी अधिकाऱ्यांच्या हाती हाेता. तक्रारी झाल्या की, खांदेपालट केली जात हाेती. अखेर चंद्रकांत राऊळ यांच्या रूपाने नियमित जिल्हा जलसंधारण अधिकारी मिळाले आहेत. त्यांनी शुक्रवारी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली.
लघू पाटबंधारेला जिल्हा परिषदेतील महत्त्वपूर्ण विभाग मानला जाताे; परंतु मागील काही महिन्यांपासून या विभागाला नियमित जिल्हा जलसंधारण अधिकारी नव्हते. त्यामुळे उपअभियंत्यांकडे पदभार देण्याची नामुष्की ओढावत हाेती. एका प्रभारी अधिकाऱ्याबाबत तक्रार झाली की, अन्य व्यक्तीला चार्ज दिला जात असे. त्यामुळे या विभागात पदभाराच्या अनुषंगाने अक्षरश: संगीत खुर्चीचा खेळ सुरू हाेता. याचा परिणाम विकासकामांवर झाला हाेता. अखेर चंद्रकांत राऊळ यांच्या रूपाने नियमित जलसंधारण अधिकारी मिळाले आहेत. त्यांनी पदभार घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांनी सत्कार केला.