अहवाल नाेंदणी ठप्प - पाेषण ट्रॅकर ॲप इंग्रजीत असल्याने हाताळणी करणे झाले कठीण
उस्मानाबाद - पोषण अभियान अंतर्गत राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने २०१९ मध्ये अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाईल फोन परत करण्याचे सत्र जिल्ह्यात सुरू झाले आहे. त्यामुळे पाेषण अहवाल नाेंदणी ठप्प झाली आहे. आजवर सुमारे ५० टक्के सेविकांनी माेबाईल प्रकल्प कार्यालयाकडे परत केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. पाेषण ट्रॅकर हे ॲप इंग्रजीमध्ये असल्याने कमी शिक्षण असलेल्या सेविकांना त्याची हाताळणी करता येत नसल्याचे सेविकांचे म्हणणे आहे.
जिल्ह्याती सुमारे १८९१ अंगणवाडी सेविकांना २०१९ मध्ये माेबाईल पुरविण्यात आले आहेत. या माेबाईलमध्ये दिलेल्या पाेषण ट्रॅकरवर स्तनदा माता, गरोदर महिला व बालकांचे वजन, उंची आदी माहिती भरून शासनाला द्यावी लागते. मात्र, शासनाने दिलेल्या सदरील मोबाइलची रॅम कमी पडते. एवढेच नाही तर नवनवीन ॲप डाऊनलोड होत नाहीत. पाेषण ट्रॅकर हे ॲप इंग्रजी भाषेत आहे. त्यामुळे कमी शिक्षण असलेल्या सेविकांना त्याची हाताळणी करता येत नाही. अनेकवेळा डाेंगराळ भागातील गेल्यानंतर रेंजही मिळत नाही. परिणामी हे माेबाईल असून नसल्यासारखे हाेतात. या सर्व प्रकाराला वैतागलेल्या अंगणवाडी सेविकांनी आता माेबाईल वापसी सुरू केली आहे. आजवर ५० टक्के माेबाईल प्रकल्प कार्यालयांकडे परत केले आहेत.
कामाचा व्याप...
अंगणवाडी सेविकांचे कामकाज पेपरलेस व्हावे, यासाठी २०१९ मध्ये हे माेबाईल देण्यात आले. परंतु, तांत्रिक अडचणी माेठ्या प्रमाणात येत आहेत. त्यामुळे अनेकवेळा सेविकांना स्वतच्या माेबाईल वरून काम करावे लागते. वेळेत माहिती ऑनलाईन केली नाही तर पगार कपातीला सामाेरे जावे लागते. इंग्रजी भाषेचा अडसरही दूर हाेत नसल्याने अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या आहेत.
असून अडचण, नसून खाेळांब...
पेपरलेस कामकाजासाठी पुरविलेले अनेक माेबाईल सध्या बंद पडले आहेत. ते स्थानिक पातळीवर दुरूस्ती हाेत नाही. त्यामुळे सेविकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. साेबतच स्वतच्या माेबाईल वरून काम पूर्ण करावे लागते.
-एक अंगणवाडी सेविका, भूम.
सरकारकडून देण्यात आलेले माेबाईल फाेन बंद पडल्यानंतर दुरूस्तीसाठी तरतूद उपलब्ध करून दिली जात नाही. त्यामुळे सेविकांना स्वतचे पैसे खर्च करावे लागत आहेत. सरकार माेबाईल रिचार्जचाही खर्च उचलायला तयार नाही. असे असेल तर कामकाज चालणार कसे?
-एक अंगणवाडी सेविका, उमरगा.
म्हणून केला माेबाईल परत...
पाेषणाच्या अनुषंगाने अहवाल देण्यासाठी पूर्वी कॅश नावाचे ॲप हाेते. त्यामुळे प्रादेशिक भाषांची साेय हाेती. सध्याच्या ॲपमध्ये केवळ इंग्रजी भाषा आहे. परिणामी कमी शिक्षण झालेल्या सेविकांना ॲप हाताळता येत नाही. तसेच दुर्गम भागातील अंगणवाडीत रेंजही मिळत नाही. दुरूस्तीसाठी शासनाकडून खर्च मिळत नाही. त्यामुळे सेवकांना पदरमाेड करावी लागते.
काेट...
अंगणवाडी सेविकांनी माेबाईल वापसी सुरू केली आहे. आपल्याकडे हे प्रमाण कमी आहे. असे असले तरी कामावर त्याचा परिणाम हाेणार नाही याची काळजी घेत आहाेत. सेविकांचे म्हणणे वरिष्ठ कार्यालयास कळविले आहे.
-बळीराम निपाणीकर, महिला व बालकल्याण अधिकारी, उस्मानाबाद.