उस्मानाबाद : लॉकडाऊन काळात रीडिंग न घेताच बिले दिल्याच्या कारणावरून बराच गहजब झाला होता. त्यामुळे अनेकांनी बिलेही भरली नाहीत. दरम्यान, आता वसुली थांबलेली असल्याने महावितरणच्या तिजोरीतील कॅश फ्लो थांबला आहे. परिणामी, सहव्यवस्थापकीय संचालकांनी कठोर पवित्रा घेतला असून, अभियंत्यांवर वसुलीची जबाबदारी त्यांनी सोपवली आहे. टार्गेट पूर्ण नाही झाल्यास कारवाईचा इशाराही त्यांनी बुधवारी काढलेल्या पत्रान्वये दिला आहे.
लॉकडाऊन कालावधीत महावितरणकडून वसुलीला काहीशी ढील देण्यात आली होती. मार्च एंड असला तरी त्यापूर्वी वाढीव बिले दिल्याच्या कारणावरून झालेल्या गोंधळामुळेही वीज बिल वसुली करण्यात अडचणी निर्माण झाल्या. मात्र, त्यामुळे घरगुती, वाणिज्यिक ग्राहक सोडून कृषी वीज बिलांच्या मागे महावितरण धावत होती. यानंतर मात्र वसुली पूर्णत: थंडावली आहे. त्यामुळे महावितरणच्या तिजोरीत जमा होणारी रक्कम आटली आहे. औरंगाबाद प्रादेशिक विभागात अधिक थकबाकी असल्याने महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांनीही वेळोवेळी या विभागाला फटकारले आहे. यामुळे औरंगाबादचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांनी आता अभियंत्यांनाच जबाबदारी निश्चित करून दिली आहे. मुख्य कार्यालयाकडून प्रत्येक महिन्याला देण्यात येणारे टार्गेट हे पूर्णच झाले पाहिजे, अन्यथा संबंधित अभियंत्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा डॉ. मंगेश गोंदावले यांनी बुधवारी काढलेल्या पत्रान्वये दिला आहे.
कोणावर कशी आहे जबाबदारी...
२५ हजार रुपयांपर्यंत थकीत वीज बिल वसुलीची जबाबदारी ही शाखा अभियंत्यांवर असणार आहे. २५ ते ५० हजार रुपयांदरम्यानची थकबाकी ही उपविभागीय अभियंत्यांना वसूल करावयाची आहे. ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत असलेली थकबाकी ही कार्यकारी अभियंत्यांना वसूल करावी लागणार आहे. १ ते ५ लाख रुपयांपर्यंत अधीक्षक अभियंता तर ५ लाखांपेक्षा जास्त थकबाकी असेल तरी मुख्य अभियंत्यांनाच वसुलीत लक्ष घालावे लागणार आहे.
आताही लाईनमनवरच ढकलणार का...
महावितरणमध्ये तांत्रिक जबाबदारीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या लाईनमनवरच वसुलीचा भार टाकण्याची प्रथा पडली आहे. अभियंत्यांचा टार्गेटचा भार ही लाईनमन मंडळीच वाहून नेत आहे. त्यात कमी पडले की लाईनमनवरच कारवाई केली जाते. त्यांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्नही घडतो. मात्र, आता सहव्यवस्थापकीय संचालकांनी अभियंत्यांचीच जबाबदारी निश्चित करून दिली आहे. तेव्हा हे अभियंते वसुलीसाठी बाहेर पडणार की पुन्हा लाईनमनच्या खांद्यावर बंदुका ठेवणार, याकडे कर्मचाऱ्यांच्या नजरा आहेत.