तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ महसूल मंडळातील गावांना शनिवारी रात्री पावसाने झाेडपून काढले. अवघ्या दाेन तासांत ७७ मिलीमीटर पावसाची नाेंद झाली. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेला तामलवाडी साठवण तलाव ओव्हर फ्लाे झाला आहे. सांडव्याद्वारे लाेखाे लिटर पाणी पुढे साेलापूर जिल्ह्यात जात आहे.
दाेन-तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवारी रात्री ७ वाजता विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. सलग दोन तास पावसाचा जोर कायम होता. या कालावधीत तब्बल ७७ मिमी पावसाची नाेंद झाली. पावसाच्या पाण्यामुळे सांगवी -मांळुब्रा साठवण तलावातील जलसाठा झपाट्याने वाढला. तर तामलवाडी साठवण तलाव मध्यरात्रीच्या सुमारास ओव्हर फ्लाे झाला. या पावसामुळे उडीद, मूग तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे माेठे नुकसान झाले आहे. सध्या शेतकऱ्यांची कांदा लागवडीची धावपळ सुरू आहे. बापू दत्तू सुरवसे यांनी शनिवारी १ एकर क्षेत्रात कांद्याची लागवड केली. मात्र, जाेरदार पावसामुळे सर्व राेपे वाहून गेली. यासाेबतच अन्य शेतकऱ्यांचेही माेठे नुकसान झाले आहे.