उस्मानाबाद - जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या उस्मानाबाद पालिकेत मागील काही दिवसांत वक्फ तथा सरकारी जागेच्या बेकादेशिररित्या मालमत्ताधारक म्हणून नकला दिल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. प्रथमदर्शनी अशा नकलांची संख्या २२ च्या घरात आहे. चाैकशीअंती ही संख्या आणखी वाढू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
उस्मानाबाद पालिकेच्या हद्दीत वक्फ तथा सरकारी भूखंडाची संख्या कमी नाही. कायद्यानुसार वक्फ बाेर्ड वा सरकारी मालकीच्या जागेतील भूखंडधारकांना मालमत्ताधारक म्हणून नक्कल देता येत नाही. हे ज्ञात असतानाही पालिकेतील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून भूखंडाचे श्रीखंड लाटण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समाेर आले आहे. शहरातील वाॅर्ड क्र. १३ मधील वक्फ तथा सरकारी मालकीच्या जागेतील भूखंडाचे नियमबाह्य व बेकादेशिररित्या ८-अ च्या नकला देण्यात आल्या आहेत. अशा नकलांची संख्याही एक-दाेन नव्हे, तर तब्बल २२ च्या घरात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, सदरील नकला देताना पालिकेतील संबंधित यंत्रणेने वसुली विभागाचे रिपाेर्ट तथा नक्कल फीस (प्रत्येकी २०० रुपये) भरून घेतलेली नाही. त्यामुळे हे प्रकरण आता नेमक्या काेणत्या वळणावर जावून ठेपते? याकडे उस्मानाबादकरांचे लक्ष लागले आहे.
चाैकट...
अधिकार नसताना दिल्या नकला...
ज्या दाेघा कर्मचाऱ्यांनी या नकला वरिष्ठांच्या स्वाक्षरीने दिल्या आहेत, त्यांचा संबंधित विभागाशी काहीही संबंध नाही, असे असतानाही त्यांनी नकला का दिल्या? काेणाच्या आदेशावरून दिल्या? आदी प्रश्न आता उपस्थित हाेवू लागले आहेत.
काेट...
नकला रद्द केल्या...
वक्फ बाेर्डाच्या जागेतील भूखंडाच्या दिलेल्या नकला रद्द करण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर संबंधित कर्मचाऱ्यांना नाेटिसाही बजावण्यात आल्या आहेत. अशा पद्धतीने यापुढे नकला देऊ नयेत, अशी सर्वांनाच ताकीद देण्यात आली आहे.
-हरिकल्याण येलगट्टे, सीओ, नगर परिषद उस्मानाबाद.
काेट...
गुन्हे नाेंदविण्याचे आदेश...
सरकारी जागेच्या भूखंडाच्या अनुषंगाने मालमत्ताधारक म्हणून ८-अ च्या नकला देता येत नाहीत. त्यामुळे ही बाब बेकायदेशीर आहे. म्हणूनच, जे काणी दाेषी असतील, त्यांच्याविरुद्ध गुन्हा नाेंदविण्याचे आदेश सीओंना दिले आहेत.
-मकरंद राजेनिंबाळकर, नगराध्यक्ष, नगर परिषद.