उस्मानाबाद -काेराेना संकटाचा विविध क्षेत्रांना फटका बसला असताना यातून बालकांचे पाेषणही सुटलेले नाही. काेराेनाच्या काळात ग्रामीण भागातील कुपाेषण जवळपास दुप्पटीहून अधिक वाढले आहे. काेराेनापूर्वी जिलह्यात तीव्र कुपाेषित बालकांची संख्या अवघी ७८ एवढी हाेती. सध्या ही संख्या १७२ वर जाऊन ठेपली आहे. तर मध्यम कुपाेषित बालकांची संख्या १ हजार ५९८ एवढी झाली. त्यामुळे हे बळावलेल्या कुपाेषण कमी करण्यासाठी ठाेस उपाययाेजना हाती घ्याव्या लागणार आहेत.
काेराेनाच्या संकटात लहान-माेठे व्यवसाय अडचणीत आले. अनेकांच्या हातचे राेजगार गेले. यातूनच अर्थकारण काेलमडले. अशा वेगवेगळ्या घटकांसाेबतच काेराेनाच्या फटक्यातून बालकांचे पाेषणही सुटलेले नाही. काेराेनाच्या काळात जिल्ह्यात नेमके कुपाेषण वाढले की कमी झाले, हे पडताळण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा याेजनेतून १५ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत धडक शाेध माेहीम राबविण्यात आली. त्यानुसार अनेक धक्कादायक बाबी समाेर आल्या आहेत. काेराेना संकटापूर्वी जिल्ह्यात तीव्र कुपाेषित (सॅम) बालकांची संख्या अवघी ७८ एवढी हाेती. परंतु, आजघडीला ही संख्या तब्बल दुप्पटीपेक्षा अधिक वाढून १७२ वर जाऊन ठेपली आहे. मध्यम कुपाेषित बालकांच्या संख्येबाबतही फारसे वेगळे चित्र नाही. ही संख्या सुमारे दीड हजारांवर जाऊन ठेपली आहे. आजघडीला १ हजार ५९८ बालके मध्यम कुपाेषणाच्या तावडीत सापडली आहेत. हे चित्र प्रशासनासह लाेकप्रतिनिधींची चिंता वाढविणारे आहे. याबाबतीत ठाेस उपाययाेजना करण्याची गरज आता व्यक्त केली जाऊ लागली आहे.
चाैकट...
तुळजापूर, मुरूम प्रकल्पात सर्वाधिक बालके...
जिल्ह्यातील दहा प्रकल्पांमध्ये मिळून जवळपास पावणेदाेनशे बालके तीव्र कुपाेषित असल्याचे शाेध माेहिमेतून स्पष्ट झाले आहे. यामध्ये सर्वाधिक कुपाेषित बालके तुळजापूर व मुरूम मंडळात असल्याचे हाती आलेल्या आकडेवारीवर स्पष्ट हाेते. प्रत्येकी २७ बालके तीव्र कुपाेषणाच्या दाढेत आहेत. यानंतर भूम प्रकल्पात आठ, परंडा १२, वाशी १३, कळंब १८, तेर २१, उस्मानाबाद १३, लाेहारा १६ आणि उमरगा मंडळात १७ बालकांचा समावेश आहे.
कळंब, तेरमध्ये सर्वाधिक मध्यम कुपाेषित बालके
मध्यम कुपाेषित बालकांची संख्या सुमारे दीड हजाराहून अधिक आहे. कळंब आणि तेर मंडळातील ही संख्या इतरांच्या तुलनेत अधिक आहे. अनुक्रमे २३२ व २२८ बालके अशा स्वरूपाच्या कुपाेषणाशी झगडत आहेत. तसेच भूम प्रकल्पात १३४, परंडा १४८, वाशी १३५, उस्मानाबाद १७५, लाेहारा ७३, तुळजापूर २१७, मुरूम ७० तर, उमरगा प्रकल्पामध्ये १८६ बालके मध्यम (मॅम) कुपाेषित आहेत.
चाैकट...
महिला व बालकल्याण विभागाकडून १५ ते ३० ऑगस्ट या कालावधीत कुपाेषित बालकांचा शाेध घेण्यासाठी धडक माेहीम राबविली. या माेहिमेतून जिल्ह्यात १७२ बालके तीव्र कुपाेषित निघाली. तर १ हजार ५९८ बालके मध्यम कुपाेषित असल्याचे समाेर आले आहे. अशा बालकांना कुपाेषणाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत. त्यास निश्चित यश येईल.
-बळीराम निपाणीकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबावि).