उस्मानाबाद : जिल्ह्यात महाबीजसाठी खरीप हंगामात बीजोत्पादन करणाऱ्या २०० शेतकऱ्यांना महाबीज व्यवस्थापनाने यादीतून वगळले आहे. या शेतकऱ्यांनी गतवर्षी सोयाबीन उत्पादन झाल्यानंतरही ते उगवण क्षमता चाचणीत पास होऊनही महाबीजला न देता खासगी बाजारात विक्री केली होती.
उस्मानाबाद जिल्ह्यात गतवर्षी ३ हजार हेक्टर क्षेत्रावर महाबीजकडून बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात १ हजार ४०० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. त्यात सोयाबीनचे प्रमाण सर्वाधिक होते. जवळपास १ हजार हेक्टरवर केवळ सोयाबीनचा बीजोत्पादनाचा कार्यक्रम महाबीजकडून राबविला होता. या कार्यक्रमांतर्गत उत्पादित शेतमालाची महाबीजकडून खरेदी केली जाते. ही खरेदी करताना शासनाने हमीभाव किंवा बाजार समित्यात जानेवारी आणि डिसेंबर महिन्यात असलेले सर्वाधिक दर गृहीत धरले जातात. शिवाय, त्यात २० ते २५ टक्के रक्कमही शेतकऱ्यांना बोनस म्हणून दिली जाते. गतवर्षी बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदीसाठी महाबीजने नमुने संकलित केले आणि त्याची उगवण क्षमता प्रयोगशाळेत तपासून घेतली. या प्रक्रियेंतर्गत बियाणे पास झालेल्या तसेच बियाणे घेऊन कंपनीस बियाणे वापस न दिलेले, तसेच पोकरा योजनेअंतर्गत शेतकरी केवळ बियाणांची रक्कम मिळणे म्हणून सहभाग नोंदविणारे असे सुमारे २०० शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली आहेत.
पॉईंटर
गतवर्षी १४०० शेतकरी
बियाणे न दिल्याने २०० शेतकरी वगळले
या वर्षी १२०० शेतकऱ्यांचे यादीत नाव
चौकट...
१७०० हेक्टरवर कार्यक्रम
गतवर्षी जिल्ह्यात ३ हजार हेक्टरवर महाबीजकडून बीजोत्पादनाचा कार्यक्रम राबविण्यात आला होता. या वर्षी १ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर कार्यक्रम देण्यात आला आहे. साेयाबीन, तूर, उडीद, मूग या बियाणांचे बीजोत्पादन करण्यात येणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा १ हजार ३०० हेक्टर क्षेत्र कमी झाले आहे.
कोट...
महाबीजकडून बीजोत्पादनासाठी बियाणे घ्यायचे, त्यानंतर बियाणे महाबीजला परत करायचे नाही. तसेच ज्या नवीन शेतकऱ्यांना बीजोत्पादनाचा अनुभव नाही असे सुमारे २०० शेतकरी यंदा वगळण्यात आले आहेत. बियाणे परत न दिलेले शेतकरी दरवर्षी वगळण्यात येणार आहेत. यंदा १ हजार २०० शेतकरी बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
आर.एम. माने, महाव्यवस्थापक महाबीज