उस्मानाबाद : शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले माजी उपजिल्हाप्रमुख बसवराज वरनाळे यांनी आपला अर्ज मागे घेतला. स्वत: खासदारांसह पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मनधरणीनंतर त्यांचे बंड शुक्रवारी थंड झाले़
गायकवाड समर्थकांनी उमरग्यात मेळावा घेऊन राजीनाम्यांची तयारी केली होती़ यानंतर गायकवाड यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अन् त्यापाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती़ शुक्रवारी सकाळी महायुतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी स्वत: खासदार गायकवाड यांची भेट घेऊन चर्चा केली़ त्यानंतर खासदारांनी उस्मानाबाद गाठून समर्थक उमेदवार वरनाळे यांचा अर्ज मागे घेतला़ उमेदवारी नाकारल्यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार गायकवाड यांनी पक्षाचा आदेश आपण पाळत असल्याचे सांगितले़ पक्षाने ठरविले म्हणून तिकीट कटले़ पक्षानेच मला आमदार केले, खासदार केले़ अजून काय मागायचे? आता काम करायला सांगितले आहे, ते करु़ राजकीय पुनर्वसनाचे पुढे बघू, असे सांगत त्यांनी नाराजीनाट्यावर पडदा टाकला़
१४ उमेदवार रिंगणातचउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांपैकी २० जणांचे अर्ज वैध ठरले होते़ त्यापैकी सहा जणांनी आता माघार घेतली असून, १४ उमेदवार रिंगणात राहिले आहेत़ यात महाआघाडीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील, महायुतीचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर, वंचित बहुजन आघाडीचे अर्जुन सलगर, बसपाचे डॉ़शिवाजी ओमन, दीपक ताटे (भापसे), अण्णासाहेब राठोड (भारतीय बहुजन क्रांती दल), विश्वनाथ फुलसुरे (क्रांतिकारी जयहिंद सेना), नेताजी गोरे, तुकाराम गंगावणे, जगन्नाथ मुंडे, सय्यद सुलतान लडखान, डॉ़वसंत मुंडे, शंकर गायकवाड व आर्यनराजे शिंदे (सर्व अपक्ष) यांचा समावेश आहे.