उस्मानाबाद : आता आंतरराष्ट्रीय वाहन परवान्याचे नूतनीकरण करता येणार आहे. त्या त्या देशातील दूतावासात हे नूतनीकरण करता येणार आहे. त्यामुळे परदेशात वाहन चालविण्याच्या परवान्याच्या नूतनीकरणाची सोय होणार आहे.
जिल्ह्यातून परदेशात नोकरी आणि शिक्षणासाठी काही जण जातात. काही नोकरीनिमित्त त्याचठिकाणी स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न करतात. यातील ९० टक्के नागरिकांना वाहन चालवता येत असल्याने त्या देशात वाहन चालवता यावे, यासाठी येथील आरटीओकडे अर्ज केला जातो. वर्षभराच्या मुदतीचे आंतरराष्ट्रीय वाहन परवानेही लागलीच दिले जातात. मुदत संपल्यानंतर पुन्हा नव्याने परवाना काढावा लागायचा. मात्र, आता आंतरराष्ट्रीय वाहन परवान्याची मुदत संपली असली तरी, घाबरण्याचे कारण नाही. कारण वाहनचालक परदेशात असेल, तर परदेशातूनही त्याला भारतीय आंतरराष्ट्रीय वाहन परवान्याचे नूतनीकरण करता येईल, दूतावासातून अर्ज केल्यास त्याचे नूतनीकरण करता येणार आहे.
असा काढा आंतरराष्ट्रीय वाहन परवाना...
१ परदेशात वाहन चालविण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाहन परवाना असणे गरजेचे असते. त्यासाठी आरटीओ कार्यालयात अर्ज करावा लागतो.
२ आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी त्या देशातील विसा व पासपोर्ट यावरील पत्ता एकच असणे गरजेचे आहे.
३ आंतरराष्ट्रीय वाहन परवान्याची मुदत एका वर्षाची असते. त्यानंतर तो पुन्हा काढावा लागत असल्याची माहिती आरटीओ कार्यालयाने दिली.
४ परमिटची मुदत संपली व परवानाधारक त्याच देशात असेल, तर तेथील भारतीय दूतावासात अर्ज करावा लागतो. यावेळी ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे सादर करावी लागतात.
कोण काढतो हा वाहन परवाना?
परदेशात वाहनचालक म्हणून नोकरीसाठी जाणाऱ्या युवकांना हा परवाना मिळू शकतो. १८ वर्षे पूर्ण असलेल्या सर्वांना हा वाहन परवाना दिला जाऊ शकतो. त्यांच्याकडे परदेशात जाण्याचा व्हिसा मात्र आवश्यक आहे.
केवळ नोकरी, व्यवसायच नाही, तर शिक्षणासाठीही परदेशात जाणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. अशा तरुणांसाठी वाहन परवाना आवश्यक असतो.
कोरोनामुळे यंदा परदेशात जाणे टळले असल्याने ऑगस्ट २०२१ पर्यंत केवळ दोन अर्ज आलेले आहेत.
कोरोनामुळे परदेशात जाणेही थांबले
२०१८ ३
२०१९ ९
२०२० ५
२०२१ ऑगस्टअखेर २
पावणेतीन वर्षात १९ जणांनी काढला परवाना
उस्मानाबाद येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून आंतरराष्ट्रीय वाहन परवाना दिला जातो. सर्व कागदपत्रे तपासूनच १ वर्षासाठी परवाना देण्यात येतो. मागील पावणेतीन वर्षांत जिल्ह्यात १९ जणांनी आयपीडी काढले आहे. आयपीडीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे अर्जासोबत जोडून शुल्काचा भरणा करून लायसन्स प्राप्त करता येते. नियम व अटींचे पालन करणे आवश्यक आहे.