माणकेश्वर : भूम तालुक्यातील तांबेवाडी येथील लघु प्रकल्प अतिवृष्टीमुळे १०० टक्के भरला आहे. परंतु, मागील अनेक वर्षापासून या प्रकल्पाची देखभाल दुरुस्ती झाली झालेले नसल्याने प्रकल्पास गळती लागली असून, तलावाच्या भिंतीला अनेक ठिकाणी मोठ्या भेगा पडल्या असल्याने तळे फुटण्याची भिती ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे. तसेच रोज हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने, हा पाणीसाठा कितीदिवस टिकेले, याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
प्रकल्पाच्या भरावावर मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढले आहेत. तांबेवाडी ग्रामपंचायतीने पावसाळ्यापूर्वीच मे महिन्यात प्रकल्प दुरुस्तीच्या भरावावरील झाडे, झुडपे काढून दुरुस्तीचा ठराव घेतला होता. त्यानुसार संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहारही केला. परंतु, यानंतर संबंधित विभागाचे अधिकारी या ठिकाणी फिरकलेही नसल्याची माहिती तांबेवाडी येथील नागरिक पद्माकर मुंडे यांनी दिली. तांबेवाडी येथील प्रकल्पाचे काम १९९३ साली पूर्ण झाले होते. या प्रकल्पासाठी ४५० ते ५०० हेक्टर जमीन संपादीत करण्यात आली होती. या प्रकल्पामुळे परिसरातील दोन हजार हेक्टर जमीन ओलिता खाली आली आहे. तसेच याच तलावातून तांबेवाडी, माणकेश्वर, सिररसाव, भांडगाव यासह ५ गावांना देखील पाणी पुरवठा केला जातो.
दरम्यान, प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थ मागील चार-पाच वर्षांपासून दुरुस्तीची मागणी पाठपुरावा करीत आहेत. परंतु, याकडे कानाडोळा होत असून, सद्यस्थितीत प्रकल्पाच्या भरावावर मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढली आहेत. कॅनलचे दरवाजेही नादुरुस्त झाले आहेत. तसेच सांडव्यालाही मोठ्या प्रमाणात भेगा पडून गळती लागली आहे. त्यामुळे प्रकल्पाची तात्काळ प्रकल्पाचे दुरुस्ती करावी अशी मागणी तांबेवाडी येथील नागरिक करत आहेत. दरम्यान, या तलावास तहसीलदार उषाकिरण शिंगारे यांनी तातडीने भेट देऊन पाहणी केली आहे.
चौकट........
तलावाच्या भरावावर मोठ्या प्रमाणात झाडे, काटेरी झुडपे वाढले आहेत. तसेच तलावाच्या भिंतीना अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. त्यामुळे गावास धोका निर्माण झाला आहे. असे असातनाही दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने संबंधित विभाग गाव पाण्याखाली जाण्याची वाट पाहत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
- पद्माकर मुंडे, ग्रामस्थ, तांबेवाडी.