नांदेड-लातूर या मोठ्या शहरांची पुण्या-मुंबईकडे जाणारी बहुतांश वाहतूक नांदेड-लातूर-बार्शी-टेंभुर्णी या मार्गे होते. रोज हजारोंच्या घरात वाहने या मार्गावरून जात असतील. नावाला राज्यमार्ग असला तरी राष्ट्रीय महामार्गाच्या बरोबरीची वाहतूक या रस्त्यावरून होते. उस्मानाबाद जिल्ह्यातील वाठवडा फाटा ते येडशी घाटापर्यंतचा रस्ता हा या राज्यमार्गाचा भाग आहे. यातील काही भागाच्या नूतनीकरणाचे काम सहा महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. त्या कामाचाही आता काही ठिकाणी बोजवारा उडाला आहे. कसबे तडवळे ते येडशी घाट या भागात तर रस्त्याचा काही भाग अक्षरशः उखडून त्या ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. परिणामी त्याचा वाहतुकीवर तर परिणाम होतोच आहे; पण अपघात, वाहनाचे पार्ट तुटणे, खराब होणे, आदळआपट होऊन वाहनातील प्रवाशांना इजा होण्याचे प्रकार घडत आहेत. काही ठिकाणी खड्ड्यात मुरूम टाकून बांधकाम विभागाने लिपापोती करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो मुरूमही पावसाने वाहून गेल्याने पुन्हा खड्डे उघडे पडल्याचे चित्र आहे.
चौकट -
राज्यमार्गाचा विस्तार कधी?
मध्यंतरी या राज्यमार्गासाठी केंद्र सरकारने कोट्यवधीची रक्कम मंजूर केल्याची बातमी आली होती. काहींनी त्याचे श्रेय घेत जाहिरातबाजीही केली. मात्र त्याचे पुढे काय झाले हे प्रशासनानेही सांगितले नाही अन् श्रेय घेणाऱ्यालाही माहीत नसावे. मात्र हा दोनपदरी रस्ता आता खड्ड्यामुळे एकपदरीही राहिला नाही, हे वास्तव आहे. चारपदरी होईल त्यावेळी होईल; पण आहे तो रस्ता तरी व्यवस्थित करा, असे म्हणण्याची वेळ वाहनधारकांवर आली आहे.